“उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेही एकत्र येतील”; ‘या’ नेत्याच्या विधानाने उंचावल्या सर्वांच्या भुवया

Uddhav Thackeray | Eknath Shinde – राजकारणात कुणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रु नसतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे आज एकत्र आले तसे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात, असे वक्तव्य शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात आगामी स्थानिक निवडणुकांचे पडघम वाजू लागताच राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. १८ वर्षांनंतर ठाकरे बंधु एका विषयासाठी एकाच मंचावर आले आणि त्यांच्यात संभाव्य युती होईल, अशी चर्चा आहे. अशात प्रताप सरनाईक यांनी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना सदर विधान केले आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले, सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. त्यातून राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. कालपरवा विधिमंडळात भाषण करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचे आवाहन केले होते. २०१९ पर्यंत आम्ही तरी विरोधात येऊ शकत नाही, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही याबाजूला (सत्ताधारी बाकावर) येऊ शकता, असे म्हटले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
विधिमंडळात शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसायला नकार दिला होता. तसेच हे दोन नेते एकमेकांना नमस्कारही करत नाहीत, असा प्रश्न विचारला असता प्रताप सरनाईक म्हणाले की, आज जे चित्र दिसते, तेच उद्या असेल असे नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचेच पाहा.
१९ वर्षांपूर्वी वेगळे झाल्यानंतर तेही एकमेकांकडे पाहत नव्हते. हसत नव्हते. आता ५ जुलै रोजी मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतीतही होऊ शकतो. पण त्यासाठी वाट पाहावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.





