Mawal Wildflowers: सह्याद्रीने पांघरला रानफुलांचा शालू! मावळच्या डोंगररांगांवर निसर्गाचा अद्भुत चमत्कार
Mawal Wildflowers: गडभटकंती करताना प्लास्टिक कचरा न टाकण्याचे आणि फुले न तोडण्याचे निसर्गप्रेमींचे आवाहन; नाजूक परिसंस्थेच्या रक्षणासाठी काळजी घेण्याची गरज.

Mawal Wildflowers- परतीच्या पावसाला सुरुवात होताच तालुक्यातील डोंगररांगांचे रूप पालटले आहे. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या डोंगरउतारांवर आता विविध रंगांच्या रानफुलांचा बहर आला आहे. हिरव्यागार गवतावर उमललेली पिवळी सोनकी, तेरडा, कारवी तसेच विविध स्थानिक रानफुले डोंगरउतारांना रंगीत किनार देत आहेत. काही पठारांवर दूरपर्यंत पसरलेली फुलांची चादर आणि त्यामागे उभ्या असलेल्या डोंगररांगा हे दृश्य निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
मावळच्या डोंगररांगांना पावसाळ्यात हिरवाईची झालर चढते. पावसाच्या सरींनी धुऊन निघालेले डोंगर, कड्यांवरून कोसळणारे धबधबे, खळखळणारे ओढे आणि दाट गवताळ प्रदेश यामुळे परिसराचे रूप खुलते. मात्र पावसाचा जोर कमी होऊन परतीच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर याच हिरवाईमध्ये रानफुलांची भर पडते. यंदा मावळातील अनेक डोंगरउतारांवर रानफुले मोठ्या प्रमाणात उमलली आहेत.
लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग, राजमाची, लोणावळा आणि खंडाळा परिसरातील डोंगररांगांमध्ये सध्या विविध रंगांची फुले पाहायला मिळत आहेत. पवनानगर परिसरातील डोंगरउतारांवरही रानफुलांनी निसर्गसौंदर्यात भर घातली आहे. दूरवरून पाहिल्यास हिरव्या डोंगरावर पिवळ्या, जांभळ्या आणि पांढऱ्या रंगांचे ठिपके उमटल्यासारखे दिसतात. सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात ही फुले अधिक खुलून दिसत असल्याने डोंगररांगांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमी गर्दी करू लागले आहेत.
मावळातील ऐतिहासिक गडकोटांना वर्षभर पर्यटक आणि गडप्रेमी भेट देतात. लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग आणि राजमाची हे गड विशेष लोकप्रिय आहेत. पावसाळ्यानंतरचा काळ या गडभटकंतीसाठी आणि निसर्ग निरीक्षणासाठी विशेष आकर्षणाचा ठरत आहे. रानफुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत असताना डोंगरावर कचरा टाकण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर आणि इतर कचरा डोंगरावर टाकल्यास या नाजूक परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. रानफुले तोडणे, त्यांच्यावरून जाणे किंवा फुलांच्या समूहात पायवाट निर्माण करणे टाळावे. तसेच डोंगरावर प्लास्टिक न नेता शक्यतो पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.
छायाचित्रकारांसाठी पर्वणी
रानफुलांचा बहर हा छायाचित्रकारांसाठीही आकर्षणाचा काळ असतो. हिरवी पार्श्वभूमी, रंगीबेरंगी फुले, डोंगररांगा आणि बदलते ढगाळ वातावरण यामुळे विविध प्रकारची छायाचित्रे टिपण्याची संधी मिळते. विशेषतः सकाळच्या वेळी दवबिंदूंनी सजलेली फुले, त्यावर बसलेली फुलपाखरे आणि मधमाश्या तसेच फुलांमधून दिसणारे डोंगरांचे दृश्य छायाचित्रणासाठी आकर्षक ठरत आहे. त्यामुळे निसर्गछायाचित्रणाची आवड असलेले नागरिक मावळातील विविध भागांत फिरताना दिसतात.






