Maval Real Estate – सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारशासाठी ओळखला जाणारा मावळ तालुका सध्या वेगवान शहरीकरण आणि वाढत्या गुंतवणुकीमुळे मोठ्या बदलांच्या टप्प्यावर उभा आहे. जमिनींचे दर अक्षरशः गगनाला भिडले असून जमिनींना सोन्याचे भाव अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या बदलांचा सर्वाधिक फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पर्यटन प्रकल्प, फार्महाऊस, रिसॉर्ट, टाउनशिप आणि औद्योगिक विस्तार यामुळे बाहेरील गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांच्या जवळ असल्याने मावळचा भूभाग गुंतवणुकीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. परिणामी जमिनींचे दर झपाट्याने वाढले असून अनेक शेतकऱ्यांसाठी जमीन विक्री हा एक मोठा आर्थिक पर्याय बनला आहे. आर्थिक गरज, कर्जबाजारीपणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा मोठी रक्कम हातात मिळवण्याच्या उद्देशाने अनेक शेतकरी आपल्या शेतीजमिनी विकण्याचा निर्णय घेत आहेत. रिसॉर्ट आणि फार्महाऊस ( संग्रहित फोेटो ) सुरुवातीला मिळणाऱ्या मोठ्या पैशामुळे हा व्यवहार फायदेशीर वाटत असला, तरी दीर्घकालीन परिणाम मात्र चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. जमीन विकल्यानंतर काही वर्षांतच अनेक शेतकरी कुटुंबे भूमिहीन झाली आहेत. एकेकाळी स्वतःच्या शेतात काम करणारे शेतकरी आज रोजगाराच्या शोधात भटकताना दिसत आहेत. काही जण जमीन व्यवहारांमध्ये एजंट म्हणून काम करू लागले आहेत, तर काही जण त्याच ठिकाणी उभारलेल्या प्रकल्पांमध्ये मजूर म्हणून काम करत आहेत. स्वतःच्या जमिनीवर मालकी हक्क असलेले शेतकरी आज इतरांच्या अधीन काम करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. एजंट, दलालांची वाढती भूमिका मावळ तालुक्यात जमिनींच्या वाढत्या किमतीमुळे मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असून त्यामध्ये एजंट आणि दलालांची भूमिका वाढली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या पैशाचे अमिष दाखवून जमीन विक्रीस प्रवृत्त केले जात असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी व्यवहारांची उलाढाल कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचेही दिसून येत आहे. शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता अल्पकालीन आर्थिक फायद्यासाठी जमीन विकली जात असली तरी दीर्घकालीन दृष्टीने शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे स्थायी साधन नष्ट होत आहे. परिणामी अनेक शेतकरी रोजगारासाठी भटकताना किंवा मजूर म्हणून काम करताना दिसत आहेत. याशिवाय शेतजमिनी कमी झाल्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होऊन अन्नव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ग्रामीण भागातील पारंपरिक जीवनशैली, संस्कृती आणि शेतीशी असलेली नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे मावळातील विकासाच्या प्रक्रियेत शेतजमिनींची घट ही आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संकट निर्माण करणारी ठरत आहे. “जमीन विकली की दोन-तीन वर्षे पैसा दिसतो. त्यानंतर हातात काहीच राहत नाही. मुलांना शेतीत रस नाही हे खरे असले, तरीही जमीन हीच खरी संपत्ती आहे. शेतकऱ्यांनी शेती टिकवण्यावर भर दिला पाहिजे. कारण एकदा जमीन गेली की परत मिळत नाही.” – सुनील चोपडे, शेतकरी, नायगाव