Sunil Shelke: भाजपसोबत युती का मोडली? आमदार सुनील शेळकेंनी भरसभेत सांगितले ‘ते’ खास कारण

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळमध्ये आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आल्याचे चित्र पहायला मिळाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही पक्षांनी शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या दरम्यान निर्माण झालेल्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण तयार झाले. सभेत बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजप नेत्यांवर तीव्र शब्दांत टीका केली.
“मावळच्या जनतेने तुम्हाला मतदान का करायचे?” असा थेट सवाल करत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपला घेरले. “पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे हे आमचे ध्येय आहे. तालुक्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत विकास पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले. याचवेळी त्यांनी निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करू नये, असा स्पष्ट इशाराही विरोधकांना दिला.
आमदार शेळके म्हणाले की, राज्यपातळीवर युती असली तरी तालुकास्तरावर संघर्ष निर्माण होत असल्याने नगर परिषद निवडणुकीत युतीचा प्रयत्न केला होता. मात्र त्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता, या वेळी भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युतीच्या वतीने आधी भव्य रॅली काढण्यात आली.
पंचायत समिती चौकात आयोजित जाहीर सभेत सुनील शेळके यांनी भाजपवर थेट टीकास्त्र सोडले. सभा अंतिम टप्प्यात असतानाच भाजपची रॅली त्याच चौकात दाखल झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.यानंतर भाजपचे कार्यकर्ते थेट तहसील कार्यालयाकडे निघाल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली.
यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे, रामनाथ वारिंगे, नगराध्यक्षा अबोली ढोरे, महिला आघाडीच्या सुवर्णा राऊत, युवक अध्यक्ष किशोर सातकर,
सारिका शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी आमदार शेळकेंच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची दिशा बदलल्याचे सांगत, त्याचा परिणाम या निवडणुकीत मतांच्या रूपाने दिसला पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज खांडभोर यांनी केले.





