Maval News – मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच अंतर्गत बंडखोरीचे चित्र पाहायला मिळाले. पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर करूनही राष्ट्रवादीतीलच काही संचालकांनी स्वतंत्र उमेदवारी दाखल केल्याने निवडणूक चुरशीची ठरली. गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत सभापती पदावर किरण हुलावळे यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवला, तर उपसभापती पदावर सुनीता केदारी या चार मतांच्या फरकाने विजयी झाल्या. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात गुरुवारी (दि. ५) ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदान प्रक्रिया घेण्यात आली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभापती पदासाठी ज्ञानेश्वर निंबळे आणि उपसभापती पदासाठी रमेश भुरुक यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पक्षाचा निर्णय काही संचालकांना मान्य नसल्याने राष्ट्रवादीचेच किरण हुलावळे यांनी सभापती पदासाठी तर सुनीता केदारी यांनी उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. खरेदी विक्री संघ, मावळ या अनपेक्षित घडामोडींमुळे निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले. सभापती पदासाठी झालेल्या मतदानात किरण हुलावळे यांना १० मते मिळाली, तर ज्ञानेश्वर निंबळे यांना ९ मते मिळाली. त्यामुळे अवघ्या एका मताच्या फरकाने हुलावळे यांनी सभापती पदावर विजय मिळवला. उपसभापती पदासाठी झालेल्या मतदानात सुनीता केदारी यांना ११ मते मिळाली, तर रमेश भुरुक यांना ७ मते मिळाली. मतदान प्रक्रियेत उमेदवार असलेल्या चारही संचालकांसह माजी सभापती शिवाजी असवले, माजी उपसभापती अमोल भोईरकर, संचालक भरत येवले, एकनाथ येवले, माणिक गाडे, बाजीराव वाजे, गणेश विनोदे, रुपेश घोजगे, शहाजी कडू, विष्णू घरदाळे, प्रमोद दळवी, मधुकर जगताप, शरद नखाते, मनिषा आंबेकर, आशा खांडभोर या १९ संचालकांनी मतदानात सहभाग घेतला. सहाय्यक म्हणून आर. के. निखारे आणि संस्थेचे सचिव किरण लोहोर यांनी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले. निवडणूक शांततेत पार पडली असली तरी राष्ट्रवादीतील अंतर्गत स्पर्धेमुळे ही निवडणूक तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीत अंतर्गत मतभेद उघड विशेष म्हणजे मावळते सभापती व उपसभापती यांचा राजीनामा घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान संस्थेतील सर्व संचालकांमध्ये एकोपा दिसून येत होता. त्यामुळे नवीन पदाधिकारी निवडताना देखील एकमताने निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत अंतर्गत मतभेद उघड झाल्याने संस्थेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.