राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! जिल्हाध्यक्षांचा आपल्याच पक्षाला थेट इशारा म्हणाले “पक्षाने आम्हाला कोललं तर…”

Pradeep Gartkar : स्थानिक निवडणुकीसाठी आता राजकीय आखाडा चांगलाच तापू लागला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या आहे. यामुळे यामधून कोणाला उमेदवाराची संधी द्यायची असा मोठा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांसमोर आहे. अशातच पुणे जिल्ह्यातून इंदापूर तालुक्यातील नगराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.
पक्षाने जर आमचं ऐकलं, योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरच आहोत, पण पक्षाने जर आम्हाला कोललं तर, आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराज राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याच पक्षाला दिला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहेत.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांचे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून नाव पुढे आले आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे यावर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी उमेदवारी निवडीवरून मोठा वाद उफाळून आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे.
…अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा थेट इशारा
या पार्श्वभूमीवर बुधवारी पुण्यात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीनंतर इंदापूरमधील प्रदीप गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची खास बैठक पार पडली. या बैठकीनंतर गारटकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने आमच्यावर अन्याय केला, तर आम्हीही गप्प बसणार नाही, जर नेतृत्वाने आमचे मत दुर्लक्षित केले, तर आम्हीही स्वतंत्र आघाडी उभी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊ, असा थेट इशारा प्रदीप गारटकर यांनी दिला आहे. वेळ पडली तर राजीनामा देणार असल्याचे देखील गारटकर यांनी स्पष्ट केले आहे.
मार्ग निघणार की…
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडींला वेग आला असतानाच इंदापूर तालुक्यात मात्र वादाचे धूके दाटून आले आहेत. नगराध्यक्ष पदाचा वाद शमण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे उभे ठाकले आहे. यातून कसा मार्ग काढला जाईल हे पाहणे महत्वाचे असणार आहे. त्यातूनही वाद नाहीच थांबला तर त्याची दिशा कशी असले हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : तालिबान सरकारचा मोठा निर्णय ; पाकिस्तानसोबत व्यापार-वाहतूकीवर बंदी , नवीन पर्याय शोधण्याचे आदेश





