Maval News: भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र…धक्कादायक कारण समोर
Maval News: जिल्हाधिकाऱ्यांचा अर्ज फेटाळण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांकडून रद्द; कलम १४(१)(ह) अंतर्गत भाजे ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई.

Maval News – भाजे ग्रामपंचायतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरपंच प्रिया ओव्हाळ, उपसरपंच कोमल केदारी तसेच सदस्य सारिका पदमुले, विकास वाल्हेकर, प्रमोद ढगे आणि कविता चौरे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. प्रताप गरवड आणि शेखर दळवी यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता.
संबंधित पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचा कर विहित तीन महिन्यांच्या कालावधीत भरला नसल्याचा दावा करीत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण चौकशीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविले. त्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी पंचायत समिती, वडगाव मावळ यांच्याकडे सोपविली.
चौकशीत संबंधितांनी कराची थकबाकी विहित मुदतीत भरली नसल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. मात्र, जिल्हाधिकारी, पुणे यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज फेटाळला. त्यामुळे गरवड आणि दळवी यांनी या निर्णयाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले. अपिलावरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे तसेच उपलब्ध कागदपत्रांचा विचार करण्यात आला. ग्रामपंचायतीची कर मागणी बिले, बिल बजावणीच्या पोहोच नोंदी,
मासिक सभांचे ठराव आणि चौकशी अहवाल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुनावणीनंतर २ सप्टेंबर २०२६ रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी आदेश पारित केला. त्यात जिल्हाधिकारी, पुणे यांनी दिलेला पूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला. तसेच वरील सहा पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले.
या प्रकरणात अपिलार्थी प्रताप गरवड आणि शेखर दळवी यांच्या वतीने अॅड. अमित आव्हाड, अॅड. सोपान मुंडे, अॅड. गौरव पाचपोळ, अॅड. जय राठोड आणि अॅड. वेदांत कारंजकर यांनी काम पाहिले. या निर्णयामुळे भाजे ग्रामपंचायतीतील विद्यमान सत्तासमीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. निर्णयाची मावळच्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
कर थकबाकी ठरली कळीचा मुद्दा
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १४(१)(ह) नुसार ग्रामपंचायतीला देय असलेला कर किंवा फी, मागणी करून विहित पद्धतीने बिल दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत न भरल्यास संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरू शकते. या प्रकरणात कर मागणी, बिल बजावणी, थकबाकी आणि कर भरण्याच्या तारखांचा विचार करून अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी अपात्रतेचा निर्णय दिला. ग्रामपंचायतीचा कर विहित मुदतीत न भरल्याच्या प्रकरणात भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचासह सहा सदस्यांना सदस्यपदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी हा आदेश दिला आहे.






