Maval News: मावळात शासनाच्या आदेशाला हरताळ! अनेक खासगी शाळांमध्येच पुस्तके, गणवेशाची सर्रास विक्री
Maval News: शिक्षण अधिकाऱ्यांच्या नोटिशीला शाळांनी केराची टोपली दाखवली; दोषी संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याची पालकांची मागणी.

Maval News – राज्य शासनाने खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना पुस्तके, शालेय गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याची सक्तीने विक्री करण्यास स्पष्ट बंदी घातलेली आहे. परंतु मावळ तालुक्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये या आदेशाचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. शाळेच्या परिसरातच पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याची विक्री केली जात असल्याने शासनाच्या आदेशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित शाळांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. मावळ तालुका शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार सर्व खासगी शाळांना पुस्तके आणि शालेय गणवेशाची विक्री शाळेमार्फत करू नये, अशा स्पष्ट सूचना यापूर्वीच दिल्या होत्या. विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतून साहित्य खरेदी करण्यास भाग पाडू नये, असेही निर्देश देण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात अनेक शाळांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान किंवा नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पुस्तके, गणवेश, वह्या आणि इतर साहित्याची यादी देण्याबरोबरच ते साहित्य शाळेतूनच घेण्यास सांगितले जाते. काही ठिकाणी तर शाळेच्या आवारातच तात्पुरते विक्री केंद्र उभारून साहित्याचे वितरण करण्यात आले.
त्यामुळे पालकांना बाजारात पर्यायी दराने किंवा आपल्या पसंतीच्या विक्रेत्याकडून साहित्य खरेदी करण्याची संधीच मिळत नसल्याची तक्रार आहे. तालुक्यातील अनेक पालकांनी शिक्षण विभागाने अचानक तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. ज्या शाळा विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तके, गणवेश किंवा इतर साहित्य घेण्यास भाग पाडत आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर यंत्रणा उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पालकांवर टाकला जातोय आर्थिक भार
शासनाने विद्यार्थ्यांसाठी बालभारती आणि एनसीईआरटीच्या मान्यताप्राप्त पुस्तकांचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, काही खासगी शाळांमध्ये इतर खासगी प्रकाशनांची पुस्तके शिफारस करण्याबरोबरच ती शाळेमार्फतच विकली जात असल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक नसलेली अतिरिक्त पुस्तकेही पालकांना घ्यावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे पालकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. एका विद्यार्थ्याच्या प्रवेशावेळी शुल्क, वार्षिक शुल्क, वाहतूक शुल्क, विविध उपक्रमांचे शुल्क यासोबतच पुस्तके, गणवेश, वह्या आणि स्टेशनरीसाठीही हजारो रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. विशेषतः दोन किंवा तीन मुले शिकणाऱ्या कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.






