Pune Rain : रामटेकडी उड्डाणपूल ते भैरोबानाला दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

पुणे : गेल्या काही दिवसानपासून पावसाने राज्यात दडी मारली होती. मात्र काल आणि आज पावसाने राज्यात पुन्हा सुरुवात केली आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पुण्यात सायंकाळी पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
आज संध्याकाळी हडपसर वानवडी रामटेकडी फातिमानगर भैरोबानाला दरम्यान झालेल्या मुसळधार पावसानंतर साडेपाच ते साडेआठ असे तब्बल तीन तास रामटेकडी उड्डाणपूल ते भैरोबानाला दरम्यान वाहतूक कोंडी झाली. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.
वाहतूक कोंडी दरम्यान अनेकांच्या वाहनातील पेट्रोल डिझेल संपल्याने अनेक वाहने जागेवरतीच बंद पडली होती. याशिवाय पाण्यातून वाहने बाहेर काढल्यानंतर दुचाकी बंद पडण्याचे प्रमाण मोठे होते. अनेकांना त्याचा चांगलाच त्रास सहन करावा लागला
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. हडपसर या भागात रस्त्यावर पाणी साठल्याने अनेक वाहने पाण्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तर काही ठिकाणी झाडे पडण्याच्या ही घटना घडल्या आहेत.
हवामान विभागाकडून अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघर वगळता संपूर्ण राज्याला आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.





