Mumbai News : मुंबईत बहुमजली इमारतीला भीषण आग; तीन जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई – मुंबईतील अंधेरी परिसरातील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. अंधेरी पश्चिमेकडील ‘रिया पॅलेस’ या इमारतीमधील दहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या आगीत दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला.
चंद्रप्रकाश सोनी (वय वर्षे ७४), कांता सोनी (७४) आणि पेलू बेटा (४२) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात रिया पॅलेस ही १४ मजल्यांची इमारत आहे.
या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी आठ वाजता आग लागली. या आगीत घरातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा आणि एका कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे.आगीत होरपळल्यामुळे या तिघांना अग्निशमन जवानांनी सुरुवातीला कुपर रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही आग सकाळी नऊच्या सुमारास आटोक्यात आली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे अंधेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





