टाकवे बुद्रुक : आंदर मावळ विभागातील दवणेवाडी (माऊ) येथील ब्रह्म प्रतिष्ठान संचलित गोशाळेत गुरुवारी (दि.६) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत गोशाळेतील तीन गायींचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य तीन गायी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती तलाठी विजय चव्हाण यांनी दिली. गोशाळेत आग लागल्याचे समजताच तळेगाव एमआयडीसी, वडगाव नगरपंचायत व पीएमआरडीए येथील अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीचे स्वरूप प्रचंड असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास वेळ लागला. अखेर अथक प्रयत्नांनी दुपारी चार वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत तीन गायी दगावल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार, ब्रह्म प्रतिष्ठान संचलित ह्या गोशाळेत एकूण १९ जनावरे होती. त्यातील ३ गायी गुरुवारी लागलेल्या आगीत मृत पावल्या आहेत. मागील सहा वर्षांपासून सुभाष नारायण देशपांडे हे ही गोशाळा चालवित आहेत. गोशाळेस आग कशामुळे लागली हे समजले नसून देशपांडे यांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी विजय चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी विजय दिमते यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. गोशाळेतील गोठ्याचे नुकसान झाले आहे. 3 गायींवर उपचार सुरु आहेत, बाकी जनावरे सुखरूप आहेत. पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे शंकर वसंतराव पाटील, विशाल चव्हाण, सचिन साळुंखे, मंगेश डावखर, संजय गायकवाड, विनायक नांगरे, अजय चव्हाण यांसह पथकातील अन्य जवान, ग्रामस्थ सर्वांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.