पुणे सामूहिक बलात्कार प्रकरण: कार्यवाही अहवाल महिला आयोगास तात्काळ सादर करावा – चाकणकर

पुणे – पतीसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना पुण्याजवळील यवत या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा कार्यवाही अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तात्काळ सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलीस प्रशासनास दिले आहेत.
पतीसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना पुण्याजवळील यवत या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपीना अटक केली असून
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 31, 2022
काय आहे घटना?
महिला आपल्या पतीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि जेवणासाठी दौंड तालुक्यातील यवत येथील एका हॉटेलमध्ये गेली होती. पती हॉटेलमध्ये विचारपूस करण्यासाठी गेला असता, विवाहिता बाहेर उभी होती. यावेळी आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला तिच्या भावाचा अपघात झाला आहे, असे खोटे सांगितले. महिलेला फसवून तिला दुचाकीवर बसवून सात किलोमीटर अंतरावर नेले. त्यानंतर एका मोकळ्या जागेत तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. याबाबत महिलेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तिच्या फिर्यादीवरुन यवत पोलिसांनी पाच जण ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला आहे.





