मरियम नवाझ बनणार पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री

लाहोर – पीएमएल-एन पक्षाच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम नवाझ या पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री बनणार आहेत. पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळणार आहे.
पंजाब प्रांताच्या विधीमंडळाचे पहिले अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये मरियम यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले जाण्याचे निश्चित आहे.
पंजाबचे राज्यपाल बलिघुर रहमान यांनी शुक्रवारी पंजाब विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. त्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार असल्याचे राज्यपालांच्या प्रवक्त्याने सांगितले.
पंजाब विधीमंडळातील १३७ जागा पीएमएल-एनने आणि इम्रान खान यांच्या पीटीआयने ११३ जागा जिंकल्या आहेत. पीटीआयचे अपक्ष जरी एसआयसीमध्ये सामील झाले, तरी त्यांना महिलांसाठीच्या आरक्षित जागा मिळवता येणार नाहीत.
त्यामुळे पीएमएल-एनला साधे बहुमत सहज मिळू शकते. त्यामुळे मरियम यांचे मुख्यमंत्री बनणे जवळपास निश्चित मानले जाते आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदासाठीची सुरक्षा आजपासूनच पुरवण्यात आली आहे. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायलाही सुरुवात केली आहे.





