nagar | विवाहित तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

राहुरी, (प्रतिनिधी): मुसळवाडी येथील २८ वर्षीय विवाहित तरुणाने आज सकाळी टाकळीमिया येथील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली.आसिफ आयुब पठाण असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मुसळवाडी येथील आसिफ आयुब पठाण याने सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास टाकळीमिया रेल्वेस्थानक परिसरात येऊन धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. यानंतर स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. पोलीस कॉन्स्टेबल राहुल यादव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दुपारी शोकाकुल वातावरणात आयुब याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत आसिफ याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. आसिफ हा हॉटेलात आचारी काम करून आपली उपजीविका चालवत होता.आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती चर्चेतून समजते. मात्र, पोलीस तपासात आधिक माहिती उजेडात येणार आहे. याबाबत पुढील तपास हनुमंत आव्हाड हे करीत आहेत.





