Rajgad Fort : बालेकिल्लावरून पाय घसरून १५० फूट दरीत कोसळून विवाहित महिलेचा दुर्देवी मृत्यू

Pune News : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या विवाहित महिलेचा बालेकिल्ल्यावरून पाय घसरल्याने १५० फुट दरीत कोसळून दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उचारांपूर्वीच डॅाक्टरांनी तिला मृत घोषित केले. कोमल सतीश शिंदे (वय-20) राहणार आळंदी असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेत मृत्यृमुखी पडलेली महिला आपल्या पतीसह राजगड किल्यावर पर्यटनासाठी आली होती. बालेकिल्ला पाहिल्यानंतर माघारी परतत असताना ही दुर्देवी घटना घडली. किल्ल्याच्या सर्वेाच्च भाग असलेल्या बालेकिल्ल्यावर ही घटना घडली. महिलेचा पाय घसरला आणि ती खाली दरीत कोसळली.
या महिलेला वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मृतदेह गडावरून खाली आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी मदत केली.
स्थानिकांचा आरोप
या घटनेमुळे आता राजगड किल्ल्यावरील सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. किल्ल्यावरील बालेकिल्ला हे सर्वाेच्च आणि अतिशय आकर्षक ठिकाण आहे. या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. अपुऱ्या संरक्षक उपायांमुळे अशा घटना घडतच असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.





