मार्केट यार्ड बुधवारी राहणार बंद

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आता व्यापारी बांधव देखील सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.1) मार्केट यार्ड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाप्पू भोसले आणि सचिव करण जाधव यांनी केले आहे. “बाजार तर बंद ठेवण्यात येणार आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत फळे व भाजीपाला विभागातील व्यापाऱ्यांसह विविध घटक गेट क्रमांक 1 येथील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यासमोर साखळी साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
दरम्यान, फुलबाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. फुलबाजारातील दोन्ही संघटना बंदामध्ये सहभागी झाल्या आहे. याबाबतची माहिती अखिल पुणे फुलबाजाराचे अध्यक्ष अरुण वीर, फुलबाजार आडते व व्यापारी संघाचे अध्यक्ष अप्पा गायकवाड यांनी दिली.
मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी लाक्षणिक बंदचे आवाहन केले आहे. व्यापारी यामध्ये सहभागी होणार आहेत.” – अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन.





