“मराठीला नेहमीच झुकतं माप देतात, आता थेट काचा फुटतील…”; अमेय खोपकरांचा मल्टीप्लेक्स मालकांना दम

Amey khopkar । ye re ye re paisa 3 | Saiyaara : सध्या ‘सैयारा’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. यातील प्रेमकहाणीने तरुण वर्गाला अक्षरश: वेड लावले आहे. अनीत पड्डा आणि आणि अहान पांडे यांच्या अभिनयाने कमाल केली. देशभरातून दोघांच्याही अभिनयाचे कौतुक केले जात आहे. प्रेक्षक भावुक होऊन ढसाढसा रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड करत असून, कमाईचे आकडे देखील दिवसेंदिवस वाढतच आहेत.
मात्र, आता याचा फटका मराठी सिनेमाला बसला असल्याचं पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटांच्या दादागिरीमुळं मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये मराठी चित्रपटांना नेहमीच झुकतं माप देण्यात येतं, हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. ‘सैयारा’ सिनेमासाठी ‘येरे येरे पैसा ३’ या मराठी चित्रपटाचे शो उतरवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय.
अश्यातच, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष व निर्माते अमेय खोपकर यांनी मल्टीप्लेक्स मालकांना दिला आहे. खोपकर यांनी पत्रकार परिषदेत घेत संतप्त भूमिका मांडली आहे. माझ्या चित्रपटासाठी मलाच आंदोलन करणे पटत नाही, मात्र मराठीची गळचेपी करून मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये लागत नसतील तर थेट काचाच फुटतील, असा इशारा त्यांनी मल्टीप्लेक्स मालकांना दिला आहे.
तसेच मी आजवर ज्यांच्यासाठी उभा राहिलो आणि अंगावर केसेस घेतल्या, त्या मनोरंजनसृष्टीतील एकही माणूस पुढे येऊन बोलत नाही. या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटते, अशी खंतही खोपकर यांनी व्यक्त केली. तर संजय राऊतांनीही पक्ष न बघता ट्विट केले. सुशांत शेलारांनीही पाठराखण केली. मराठी भाषा, मराठी चित्रपट आणि एकूणच मराठी मनोरंजनक्षेत्रातील विविध मंडळी, मनसेसह इतर राजकीय पक्ष एकवटले आहेत, त्यांचे आभारही खोपकर यांनी पत्रकार परिषदेत मानले.
‘अनेक कलाकार व तंत्रज्ञांनी ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे चित्रपट चालणार की नाही? हे एका आठवड्यात कसे ठरवता? मराठी चित्रपटांना डावलून हिंदीला कसे काय प्राधान्य दिले जाते? दादरसारख्या मुंबईतील मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्लाझा चित्रपटगृहात एकही शो मराठी चित्रपटाला देण्यात आलेला नाही, सर्वच्या सर्व ४ शो ‘सैय्यारा’ या हिंदी चित्रपटाला देण्यात आले आहेत.
तुम्हाला अमेय खोपकरवर राग आहे, तर अमेय खोपकरचा चित्रपट लावू नका. पण बाकीचे मराठी चित्रपट तरी मल्टिप्लेक्समध्ये दाखवा. महाराष्ट्रातील चित्रपटगृहात मराठी चित्रपट लावण्याची मागणी सरकारकडे करावी लागते, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आम्ही सरकार दरबारी जाणार नाही, सरकारने मराठी चित्रपट व निर्मात्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे’, असे स्पष्ट मत अमेय खोपकर यांनी स्पष्टपणे व्यक्त केले.
संजय राऊत भडकले !
उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आता या संदर्भात ट्विट करत भाष्य केलंय. मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत, लढत येत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत, सैयारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून- “येरे येरे पैसा ३”या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले, हे नेहमीचेच झाले आहे, मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल, मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत जय महाराष्ट्र! असं संजय राऊत यांनी म्हटलंय.





