Maratha Reservation : चेहऱ्यावर समाधान, डोळ्यात पाणी…; मनोज जरांगे आनंदात ढसाढसा रडले !

Maratha Reservation | Manoj Jarange | मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या मराठा उपसमितीने जरांगे यांच्या सहा प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत.
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसह मराठा-कुणबी एकतेचा शासन निर्णय (जीआर) काढण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मराठ्यांकडून विजयी जल्लोष केला जात आहे.
हैदराबाद गॅझेटसंदर्भातील जीआरही सरकारने काढला आहे. तर आगामी एका महिन्यात सातारा गॅझेट लागू केले जाईल, असे सरकारने सांगितले आहे. दरम्यान सरकारने या मागण्या मान्य केल्यानंतर आता मनोज जरांगे यांना भावना अनावर झाल्या आहेत.
राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर जरांगे भावुक झाले आहेत. ते आनंदात ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होते. उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
तसेच मी आता रुग्णालयात जाणार आहे असंही त्यांना सांगितलं. पाच दिवसांच्या या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर आता मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे.





