Maratha reservation protest | ५ सप्टेंबरला सुपा येथे रास्ता रोकोचा इशारा; मराठा समाज आक्रमक

प्रभात वृत्तसेवा
पारनेर – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो समाजबांधव मुंबईला दाखल झालेले आहेत. जरांगे पाटील यांनी आजपासून पाणी त्याग केलेले आहे. त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे.
जर जरांगे पाटील यांच्या जीवितास काही बरेवाईट झाले तर सरकारला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वाहने खाद्यपदार्थ, सुकामेवा, पाणी बॉटल घेऊन मुंबईला जात आहेत. पारनेर तालुक्यातून ही पारनेर शहर, सुपा, भाळवणी, कान्हूरपठार, हिवरेकोरडा, वडगावआमली, अळकुटी, निघोज, वडझिरे, म्हसोबा झाप या गावांतून प्रत्येकी २ गाडया खाद्यपदार्थ मुंबईकडे रवाना झालेले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनास पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून तोडगा न निघाल्यास तालुक्यातील सुपा येथील चौकात शुक्रवार दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे.





