Maratha reservation protest | मराठा आंदोलनासाठी मुस्लिम बांधवांचा मदतीचा हात

प्रभात वृत्तसेवा
पाटस – राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत लाखो मराठा बांधवांचे सुरू असलेल्या उपोषणाला अन्न आणि पाणी तसेच इतर सुविधाच्या मदतीसाठी पाटस येथील मुस्लिम बांधवांनी रोख रक्कम, अन्न, पाण्याचे बॉक्स तसेच मिळेल त्या वस्तू मुंबईकडे रविवार (दि.३१)) रोजी रवाना केल्या आहेत.
दौंड तालुक्यातील पाटस येथील मुस्लिम बांधवांकडून मुंबई तील मराठा आंदोलकांसाठी ३५ हजार २०० रोख रक्कम व ५० च्या वर पाणी बॉक्स मदतीच्या स्वरूपात देण्यात आले आहेत. मुंबईत मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मराठा बांधवांच्या मदतीला मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाने मदतीचा हात पुढे केला आहे. मागील चार दिवसापांसून सुरू असलेल्या या आंदोलनाला कोणत्याही प्रकारची सुविधा मिळू नये यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे आरोप होत आहे.
सरकारने आंदोलनाच्या ठिकाण परिसरातील खाऊ गल्ली बंद करण्याचे आदेश दिले. अन्न, पाणी, वीज मिळू नये याची दक्षता घेतली. आंदोलकांची गैरसोय होईल असे कृत्य केल्याचा गंभीर आरोप सरकारवर आंदोलक करीत आहेत. मात्र सरकारच्या चाणक्य नीतीला मराठा समाजाने शिव नीतीने उत्तर दिले. आंदोलन करताना राज्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात अन्न पाणी आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील गावागावातून चटणी, भाकरी, पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स, तसेच आंदोलना ठिकाणी अन्नधान्याची कमतरता पासून येण्यासाठी ट्रकचे ट्रक मुंबईकडे रवाना झाले.यावेळी जुनेद तांबोळी, जाकीर तांबोळी, रियाज तांबोळी, कदीर तांबोळी, शाहिद बागवान, जाकीर बागवान, आजीम बागवान, मोहसीन तांबोळी, नौशाद शेख, अमीर शेख, शब्बीर कुरेशी, जुबेर भैलिमकर हे मुस्लिम बांधव उपस्थित होते.
सामाजिक एकोपा जपला..
हिंदू मराठा बांधवांसाठी मुस्लिम समाजाच्या महिलांनी भाकरी तयार करून आंदोलना ठिकाणी मराठा बांधवांना पुरवल्या. मुस्लिम समाजातील विविध संघटनांनी पाण्याची बॉक्स आणि पाहिजे त्या सेवा आंदोलकांना पुरवून मदतीचा हात पुढे केला. ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांनी ही मुंबईत मराठा बांधवांसाठी आपापल्या परीने हातभार लावला जात आहे. ग्रामीण सामाजिक एकोपा जोपासला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुणी कितीही प्रयत्न केला तरी सामाजिक एकोपा हे कायम राहील हाच संदेश यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी दिला आहे.




