Pune News | आंदोलनावर कोर्टाचे आदेश, सरकारकडून कायदेशीर मार्गाचा विचार-मुख्यमंत्री फडणवीस

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मराठा समाजाच्या आंदोलनासाठी उच्च न्यायालयाने परवानगी देताना अटी व शर्थी घातल्या होत्या. सध्या, रस्त्यांवर जे सुरू आहे, त्यासंदर्भात जाहीर नाराजी व्यक्त करीत काही आदेश न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे प्रशासनाला क्रमप्राप्त असून त्याचे पालन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात कायदेशीर मार्ग शक्य असल्यास काढण्याची आमची मानसिकता असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
पुण्यात विविध कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन तसेच उच्च न्यायालयाने दिलेले आदेश यावर विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार केला. तसेच, जिथे मार्ग काढता येऊ शकतो ते कायदेशीररित्या न्यायालयात कसे टिकवू शकतो, यासंदर्भातही चर्चा झाली. त्यातील अधिकची माहिती मागितली आहे.
आंदोलनात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री यांनी सांगितले की, पत्रकारांवर हल्ला आणि महिला पत्रकारांचा विनयभंग हे गालबोट लावणारे आहे. आपण 30 पेक्षा जास्त मराठे मोर्चे, त्यांची शिस्त पाहिली आहे. त्या मोर्चांनंतर सरकारने सकारात्मकपणे त्या काळात घेतलेला निर्णयही पाहिला आहे. पत्रकार आपले काम करत असतात. लोकशाहीत तुमची भावना पोहोचवत असताना असा हल्ला होणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता कारवाई करावी लागेल. सरकारला आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. सरकार अहंकार ठेवत नाही. जो शक्य आहे तो मार्ग काढत आहोत. कायदे तज्ज्ञांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने हा केंद्राच्या नाही तर राज्याच्या अख्त्यारितचा विषय असल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
सुळेंनी राजकीय पोळी भाजू नये..
खासदार सुप्रिया सुळे यांनी सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणे बंद करावे, यामुळे आपलेच तोंड पोळणार आहे. सुळे यांनी मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले आणि तोडगा कोणी काढला, याचा विचार करायला हवा. अडीच वर्षं यांचे सरकार असताना मराठा समाजासंदर्भात एकही निर्णय घेतला नाही. याउलट युतीचे सरकार असताना निर्णय झाले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सरकारची सामंजस्याचीच भूमिका..
कायदा सुव्यवस्था कोलमडली असे म्हणता येणार नाही. बंद आणि रास्ता रोको झाले तिथे पोलिसांनी 15 ते 20 मिनिटांत स्थिती पूर्ववत केली. काही घटना भूषणावाह नाहीत, अशा घडल्या आहे. आंदोलकांकडून अशी अपेक्षाा नाही. त्याचंही समर्थन होणार असेल तर महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे, असा सवाल करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची सामंजस्याचीच भूमिका असल्याचेही सांगितले.





