Manchar News | आम्ही उपाशी राहू देणार नाही ; मराठा आंदोलकांसाठी गावोगावातून मदतीचा पूर

प्रभात वृत्तसेवा
मंचर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मुंबई येथील आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांना अन्न-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आंबेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ रविवार, दि.३१ रोजी सुरू झालेला आहे.शनिवार, दि.३० रोजी सोशल मीडियावर मराठा आंदोलकांना अन्न आणि पाण्याची सोय करावी.
यासाठी सर्वांनी मदत करावी,असे आवाहन सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आले. त्याद्वारे मंचर बाजार समिती येथे अन्नपदार्थ,पाणी याचे जवळपास ३० टेम्पो गावावरून भरून आले होते. गावागावातून शेतकरी, युवक, महिला मोठ्या संख्येने पुढाकार घेत आंदोलकांसाठी अन्नधान्य, पिण्याचे पाणी, चपाती, भाकरी, लसणाची चटणी, ठेचा, भेळ, बिस्कीटे, भाजीपाला, दूध, फळे, तयार अन्नाचे डबे अशा विविध स्वरूपातील मदत टेम्पोद्वारे मुंबईत पोहोचवत आहेत.
काही गावे तर आंदोलकांसाठी खास वाहनांतून शिधा भरून पाठवत आहेत. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींकडूनही गावकऱ्यांनी स्वखर्चाने किंवा देणगी स्वरूपात अन्नधान्य जमा करून गाड्या रवाना केल्या आहेत. स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आंदोलकांना रोजच्या जेवणाची चिंता भासत नाही. आंदोलकांना उपासमारी किंवा पाण्याअभावी त्रास होऊ नये. याची काळजी प्रत्येक गावकऱ्याने घेतली आहे.
आंदोलनाला सामाजिक पाठबळ..
ग्रामीण भागातून मिळणारी मदत ही केवळ भौतिक स्वरूपातली मदत नसून, ती या आंदोलनाला मिळणाऱ्या सामाजिक बळाची साक्ष आहे. मुंबईतल्या आंदोलनस्थळी दिवसेंदिवस आंदोलकांची संख्या वाढत असून, गावोगावातून मिळणाऱ्या मदतीमुळे त्यांचा उत्साह अधिक दुणावलेला आहे.आपण उपाशी राहू देणार नाही” अशी हाक ग्रामीण जनतेकडून येत असून, त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मानसिक आधारही मिळत आहे.
यामुळे आंदोलन केवळ मुंबईत सिमित न राहता, संपूर्ण राज्यातील गावागावातून आंदोलकांना आधार देणारी एक चळवळ उभी राहिली आहे. अशी माहिती सकल मराठा समाजाचे नेते अजय घुले, गोविंद खिलारी,गणेश खानदेशे, राजाराम बाणखेले, नितीन मिंडे व अशोक गव्हाणे इत्यादींनी दिली.





