Maratha Reservation Morcha : मराठा मोर्चाबाबत फडणवीस-पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…..

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
आज दुपारीच 3 वाजता मनोज जरांगे पाटील आपली निर्णायक भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासोबतचं भगव वादळ मुंबईत धडकणार की हे वादळ मुंबईच्या वेशीवरूनच परत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जरांगे पाटील यांनी सर्वांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं.
मराठा मोर्चाबाबत फडणवीस-पवार काय म्हणाले? पाहा….
देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येकाला आंदोलन करण्याचे अधिकार आहेत. केवळ हे आदोलन शांततेत व्हावं. उच्च न्यायालयाचे यासंबंधीचे आदेश आहेत. या आदेशाचं आम्ही पालन करू. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करू. तर, अजित पवार म्हणाले, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. याप्रश्नी चर्चेतून तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मनोज जरांगे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –
– या सगळ्या मागण्यांचा अध्यादेश काढा. मी शब्द देतो की एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही. आज रात्रीपर्यंत आम्हाला हा अध्यादेश द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी यावेळी केली आहे.
– आरक्षण मिळेपर्यंत १०० टक्के शिक्षण मोफत करावं, तसेच तो पर्यंत शासकीय जागांची भरती करायची नाही.
– अंतरवलीसह राज्यातील सर्व गुन्हे सरकारने मागे घेतले पाहिजे, त्या आदेशाचं पत्र आम्हाला द्यावं असं देखील जरांगे म्हणाले.
– शिंदे समितीची मुदत वर्षभरासाठी वाढवा अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच सगेसोयऱ्यांसोबतचा अद्यादेश काढावा असं देखील मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं.
– ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र मिळतंय. एक नोंद जरी सापडली तरी 50-50 जणांना त्याचा लाभ मिळतोय. यामुळे 2 कोटी मराठे लाभार्थी ठरत आहेत.
– संपूर्ण देशाचं आपल्याकडे लक्ष लागून राहिलं आहे, त्यामुळे जबाबदारीनं वागा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
– नोंदणी सापडल्या तरी अर्ज करावा लागणार आहे, अर्ज नाही केला तर प्रमाणपत्र मिळणार नाही.
– शासनासोबत चर्चा झालीये, आपल्या मागण्यांवरच सरकारबरोबर चर्चा केली.
– छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मनोज जरांगे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली आहे.





