नोंद : पेट्रोल-डीझेलमुक्त जगाच्या दिशेने

जगातील अनेक शहरे पेट्रोल-डीझेलमुक्त शहरे म्हणून विकसित होत आहेत. प्रदूषणमुक्त होण्यासाठी त्या देशांनी टाकलेली पावले स्वागतार्ह आहेत.
ग्रीन एनर्जी विषयावरील एका अहवालानुसार, जगात सध्या 1.2 अब्ज गाड्या आहेत आणि 2035 पर्यंत त्यांची संख्या 2 अब्जांपर्यंत पोहोचेल. सध्याच्या काळात काही मोजक्याच गाड्या पेट्रोल, डीझेलव्यतिरिक्त अन्य इंधनावर चालतात; परंतु आता जगातील अनेक देश 2030 पर्यंत आणि सर्वाधिक देश 2045 पर्यंत पेट्रोल, डीझेलमुक्त शहरांचे लक्ष्य समोर घेऊन कार्यरत आहेत.
2016 पर्यंत जगभरात एकंदर राखीव तेलसाठे 1.65 लाख कोटी टन इतके होते, असा अंदाज आहे. जगाच्या दरवर्षीच्या मागणीच्या 46 पट हा साठा होता. याचा अर्थ पर्यावरणतज्ज्ञ असा काढत आहेत की, जगात आता 47 वर्षे चालू शकेल एवढाच इंधनाचा साठा उपलब्ध आहे. म्हणजेच 2063 हे वर्ष येता-येता, जग पेट्रोल, डीझेलमुक्त झालेले असेल. कदाचित थोडाबहुत इंधनसाठा शिल्लक राहिलाच तरी त्यावर चालणाऱ्या गाड्या आपल्याकडे नसतील. म्हणजेच, अशा गाड्या भूतकाळ बनल्या असतील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास इंधनाच्या गरजा भागविण्यासाठी जग वेगवेगळ्या पर्यायांवर अवलंबून असेल.
प्रदूषणमुक्त, ट्रॅफिकमुक्त आणि इंधनासाठी होणाऱ्या ससेहोलपटीपासून मुक्त ज्या जगाचे स्वप्न आज जगभरातील शहरे पाहत आहेत अशा शहराची निर्मिती करण्याची योजना अमेरिकेतील मिशीगन प्रांताच्या मॅकिनॅक आयलंडने 1898 मध्येच सुरू केली होती. त्याच वर्षी या बेटावर सर्व स्वयंचलित वाहनांवर बंदी घालण्यात आली. या बेटावरील लोक ये-जा करण्यासाठी सायकलींचा आणि पारंपरिक बग्ग्यांचा वापर करतात. आपली पारंपरिक ओळख जोपासणारे हे शहर अनेक दशकांपासून जगभरातील निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी आकर्षणकेंद्र बनले आहे. आज संपूर्ण जगभरातील अन्य शहरे प्रदूषणापासून मुक्तता मिळविण्याची लढाई लढत असताना या शहरातील लोकांना स्वतःबद्दल अभिमान असणे स्वाभाविक आहे.
घरे, कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांच्या मागून आणि पुढून जाणारे जलमार्ग तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तरंगणाऱ्या नौका, वॉटरबस तसेच स्टीमर्स अशा दृश्यांमुळे अतिशय सुंदर दिसणारे इटलीतील व्हेनिस शहर जगभरात वाहनमुक्त शहरांचा एक आदर्श म्हणून ओळखले जाते. शहरभर सर्वत्र रस्त्यांऐवजी कालव्यांचे जाळे विणण्यात आले आहे. लोकांकडे गाड्यांऐवजी स्वतःच्या नौका आहेत आणि सार्वजनिक वाहतूक प्रणाली म्हणूनही मोठ्या नौकांचाच वापर केला जातो. कुठेही येण्या-जाण्याचे नाव हेच एकमेव साधन आहे. येथील लोक येण्या-जाण्यासाठी या प्रदूषणमुक्त साधनांचा प्रचंड वापरही करतात.
अर्थात, ही दोन्ही अशी शहरे आहेत, जिथे निसर्गपूरक जीवनशैलीचा अवलंब फार पूर्वीपासूनच केला गेला होता. परंतु आधुनिकतेचे प्रतीक मानली गेलेली काही शहरे अशी आहेत, ज्यांनी ग्रीन एनर्जीच्या वापराच्या दिशेने वेगाने पावले उचलली. भारतासारख्या देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आताशी 1-2 टक्क्यांवरच आहे. परंतु नॉर्वेसारखे देश या दिशेने आधीच पुढे निघून गेले आहेत. तेथे एकूण कारविक्रीच्या 60 टक्के विक्री इलेक्ट्रिक वाहनांचीच होते. 2025 पर्यंतच कार्बन उत्सर्जन करणाऱ्या वाहनांपासून मुक्तता मिळविण्याचे उद्दिष्ट नॉर्वेने ठेवले आहे. नॉर्वेची राजधानी ऑस्लो व्यतिरिक्त जगातील अनेक शहरांनी प्रदूषणमुक्त फ्यूचर सिटीज बनविण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. अमेरिकेने सन 2035 पर्यंत 100 टक्के कार्बनमुक्त इलेक्ट्रिकसिटीचे उद्दिष्ट ठेवले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहर 2035 पर्यंत गॅसोलिनवर आधारित मोटारींची आणि ट्रक्सची विक्री पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीला लागले आहे. त्याचप्रमाणे जर्मनीतील अनेक शहरांनी 2018 पासूनच डीझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालायला सुरुवात केली होती.
ब्रिटनने 2025 पर्यंत पेट्रोलवर चालणाऱ्या बसेस आणि 2030 पर्यंत पेट्रोलवरील मोटारींची खरेदी पूर्णपणे बंद करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तेथील उद्याचे चित्र कसे असेल हे पाहायचे असल्यास लंडनच्या बीच स्ट्रीटवर जायला हवे. पेट्रोल आणि डीझेलवर चालणाऱ्या वाहनांना या रस्त्यावर आजही बंदी आहे. इमर्जन्सी वाहने वगळता येथे अन्य कोणत्याही वाहनाला परवानगी मिळत नाही तसेच पार्किंगसाठीही जागा मिळत नाही. उलटपक्षी सोलर, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांना येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांना पेट्रोल, डीझेल युगापासून तुटणे आणि पुढे जाणे क्रमप्राप्तच आहे.
पेट्रोल-डीझेलच्या वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणातून मुक्तता मिळविण्यासाठी फ्रान्सच्या पॅरिस शहरात अनेक बदल केले जात आहेत. या शहरात अनेक दिवस “कार-फ्री डे’ म्हणून साजरे केले जातात. याखेरीज 2024 पासून शहराच्या अंतर्गत रस्त्यांना “कार-फ्री झोन’ म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर लोक केवळ ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या सार्वजनिक परिवहन प्रणालीच्या वाहनांचाच वापर करू शकतील.
पॅरिसमधील अनेक भागांमध्ये कार-फ्री झोन तयार करण्याच्या योजनेवर स्थानिक प्रशासन काम करीत आहे. 2030 नंतर पेट्रोल, डीझेलवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर दिसणारसुद्धा नाहीत. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन पुढील तीन वर्षांत शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. सायकल हेच या शहराचे फॅशन स्टेटमेन्ट आहे. सायकल लेन संपूर्ण शहरभरात अत्यंत सुरक्षित बनविण्यात आले आहेत. कॅनडातील अत्यंत सुंदर असे वॅंकुवर 2050 पर्यंत शहर तेलाच्या वापरापासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2040 पर्यंत पेट्रोल-डीझेलच्या सर्व वाहनांवर बंदी आणली जाईल आणि 2050 पर्यंत तेलाच्या अन्य कारणांसाठी केल्या जाणाऱ्या उपयोगावरही बंदी आणली जाईल.
ज्यांच्याजवळ कार नाही आणि तरीही शहरातील सर्व उत्तम स्थळांवर आपल्याला फिरायचे असेल, तर न्यूझीलंडची राजधानी ऑकलंड शहराचे उदाहरण उत्तम आहे. शहरातील सर्व महत्त्वाच्या शहरांना जोडणारे रॅपिड रेल नेटवर्क, इलेक्ट्रिक कार आणि टॅक्सी, शहराच्या मधून चालणारे क्रूज असे प्रदूषणविरहित वाहतुकीचे चित्र ऑकलंडमध्ये दिसून येते. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाउन या शहरातील अनेक रस्ते कार-फ्री झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. एक रस्ता प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 2 ते रात्री 11 या कालावधीत कार-फ्री करण्याच्या घटनेपासून या मोहिमेची सुरुवात झाली. मेक्सिको सिटी मुळातच पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीसाठी ओळखली जाते. 2019 मध्ये या शहरात डीझेल गाड्या कमी करण्याची योजना सुरू झाली. अधिक प्रदूषण करणाऱ्या वाहनांपासून शहराला 2025 पर्यंत मुक्त करण्याची योजना आखण्यात आली आहे.
इक्वेडोरच्या क्विटो शहरानेही 2035 पर्यंत पेट्रोल-डीझेल वाहनांना बंदी घालण्याची योजना कार्यान्वित केली आहे. स्वस्त इलेक्ट्रिक कार निर्मितीचे काम येथील अनेक कंपन्या वेगाने करीत आहेत. स्पेनमधील बार्सिलोना शहरातील 50 हजार गाड्या आणि मोटारसायकलींना विश्रांती देण्याची योजना आखण्यात आली असून, जास्त प्रदूषण पसरविणाऱ्या वाहनांना सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सर्व रस्त्यांवर बंदी घालण्यात आली असून, पकडल्यास मोठा दंड वसूल करण्यात येतो. भारतानेही 2030 पर्यंत पेट्रोल, डीझेलवर चालणाऱ्या वाहनांपासून मुक्तीच्या दिशेने पावले उचलली असून, देशात इलेक्ट्रिक कार आणि हायड्रोजन कार यांचे लॉंचिंग वेगाने सुरू करण्यात आले आहे.





