Pune : शहरातील झेडपीच्या जागा विकसित करणार

पुणे : मार्केडयार्ड, कोथरुड, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी अशा महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा आता विकसित करण्यात येत आहेत. याठिकाणी व्यापारी संकुल, गाळे, माॅल उभारण्यात येणार असून, त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेला कायमस्वरुपी उपन्नाचा नवा स्त्राेत मिळणार आहे.
राज्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद असलेल्या पुणे जिल्हा परिषदेकडून शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा वापराविना पडून आहेत. या जागेचा वापर जिल्हा परिषदेकडून केला जात नाही. त्यामुळे या जागेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. कित्येक वर्षांपासून या विषयावर चर्चा होते. मात्र पुढे काहीच कार्यवाही होताना दिसत नाही. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. त्यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या मालकीची मार्केट यार्ड येथे ३० गुंठे, कोथरूड येथे सुमारे एक एकर; तसेच कोरेगाव पार्क, बिबवेवाडी येथे काही प्लॉट आहेत. मार्केट यार्डातील सुमारे ३० गुंठे जागेवर गोदाम आहे. या ठिकाणी ‘उमेद’ बचतगटांना भाडेतत्त्वावर व्यापारी गाळे देण्याचा विचार सुरू आहे. त्याच ठिकाणी झेडपीचे रेकार्ड ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचा प्रयत्न आहे.
कोथरुड येथील डहाणूकर काॅलनी येथे जिल्हा परिषदेची एक एकर जागा आहे. याठिकाणी मोठे माॅल उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने बांधकाम व इमारतीच्या रचना तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहे. येथील जागेवर जिल्हा परिषदेला उत्पन मिळेल. त्याचबरोबर काही जागा जिल्हा परिषदेला विविध कामासाठी वापर करता येणे शक्य होणार आहे. शहरातील अन्य जागेवर बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
सीईओचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मालकीची शहरात असलेल्या सर्व ठिकाणीच्या जागेची पाहणी केली. ह्या जागा आता विकसित करण्यात येणार आहेत. तसेच मार्केडयार्ड, कोथरुड येथे व्यापारी संकुल, गाळे, माॅल उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरु केली आहे.
– गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी





