भाजपाचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गौप्यस्फोट

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, ज्यांना कोणाला यायचे आहे, त्यांचे तांत्रिक कारणांमुळे नगरसेवक पद रद्द होऊ नये. तसेच निवडणूक लढवण्यासाठी ते अपात्र ठरु नयेत, याची खबरदारी घेण्यास मी सांगितले आहे. ज्यांची निवडून येण्याची क्षमता म्हणजेच इलेक्टिव्ह मेरिट आहे. त्यांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (दि. 17 ) दिली.
आकुर्डीतील एका खासगी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, भाजपच्या अनेक नगरसेवकांना पाठीमागच्या काळात मी संधी दिली. माझ्या पक्षामार्फत त्यांना तिकीट दिले. अनेक वेगवेगळी पदे दिली. भाजपमध्ये आता जे आहेत ते आमच्यातूनच घडले. राजकारणात चढ-उतार येत असतो. पाठीमागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. भाजप सत्ताधारी पक्षात होता. त्यावेळेस काही लोकांना भाजपमध्ये जाऊन सत्ताधारी पार्टीत राहू, असे वाटत होते.
शहरात चांगल्या प्रकारे काम करायचे असेल तर, महापालिका ताब्यात असल्यावर कामांबाबत समन्वय साधता येतो. मी विकासाचे व्हिजन ठेऊन काम केले. आत्ताही आमच्या ताब्यात महापालिका नसली तरी, प्राधिकरणाचा काही भाग पिंपरी महापालिकेत ठेवला. महापालिकेच्या हद्दीत जागतिक दर्जाची भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीला राज्य शासनाकडून मंजुरी दिली आहे.
माझ्या संपर्कात भाजपचे बरेचजण आहेत. परंतु, ज्यांना कोणाला यायचे आहे, त्यांनी आल्यानंतर त्यांचे नगरसेवकपद रद्द होता कामा नये, याची खबरदारी घेण्याचे मी त्यांना सांगतो. ते अपात्र झाले तर सहा वर्ष निवडणूक लढविता येत नाही. आता आलेले अपक्ष आहेत. पत्नी नगरसेवक असेल तर पती आले आहेत. त्यांना पद रद्द होण्याचा त्रास होणार नाही. ज्यांचे इलेक्टिव्ह मेरिट आहे. त्यांनाच पक्षात प्रवेश दिला जाईल. शेवटी मॅजिक फिगर महत्वाची असते, असेही पवार म्हणाले.
महापालिकेत सत्ता असावी ही माझी इच्छा
शहराचा आणखी विकास करण्यासाठी महापालिकेची सत्ता ताब्यात असावी, अशी माझी इच्छा आहे. जसे 288 मध्ये 145 आमदार गोळा करेल ते मुख्यमंत्री होतात आणि सरकार चालवितात. तशाच पद्धतीने महापालिकेत देखील असते. महापालिकेतील बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर पक्षाकडे आवश्यक असते. येत्या महापालिका निवडणुकीत ही मॅजिक फिगर राष्ट्रवादीकडे असेल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
सत्ता गेल्याची आजही खंत
मागे राज्यातील सत्ता भाजपकडे होती. त्या सत्तेचा वापर कशा पद्धतीने झाला याची माहिती आता पोलिसांकडून आढावा घेत असताना पुढे येत आहे. चारचा वॉर्ड करत असताना कुठला भाग काढायचा, कुठला ठेवायचा, आमच्या उमेदवारांना त्रास होईल, अशा पद्धतीने भाजपने वॉर्ड रचना केली. मी अशा पद्धतीने खालच्या पातळीचे राजकारण कधीच केले नाही, हे दाव्याने सांगतो. आपण काम केले. तर लोक निवडून देणार, वॉर्ड रचनेमध्ये काय आहे, असे मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचो. तो भाग काढा आणि हा भाग घ्या, असे काही नसते, असे माझे मत असायचे. परंतु, त्यावेळेस इतकी विकासकामे करुन देखील जनतेने दिलेल्या निर्णायामुळे आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागले, अशी खंतही पवार यांनी यावेळी बोलून दाखविली.





