मुलाच्या जमीन घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले? पत्रकारांनी प्रश्न विचारताच…

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी पुण्यातील ४० एकर सरकारी जमीन कवडीमोल दरात विकत घेतल्याचे प्रकरण उजेडात आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या जमीन खरेदी व्यवहारासाठी केवळ ₹५०० स्टॅम्प ड्युटी आकारण्यात आल्याचा कागदोपत्री पुरावा समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करत तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधकांचे निलंबन केले आहे.
वरळी डोम, मुंबई येथे एका कार्यक्रमासाठी आलेले अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी याच जमीन खरेदी व्यवहारसंदर्भात प्रश्न विचारले. मात्र, अजित पवारांनी यावर कोणतेही भाष्य करणे टाळले. त्यांनी माध्यमांचे माईक बाजूला सारत कोणतीही प्रतिक्रिया न देताच निघून गेले.
या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “१८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी करता येते, पार्थ पवारांच्या कंपनीची स्टॅम्प ड्युटी ४८ तासात माफ होते,?” असा सवाल करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनीही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.





