Manoj Jarange : जरांगे विरूद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा पेटणार? सामूहिक आमरण उपोषण होणार, तारीख पाहा

Manoj Jarange : विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर नुकतेच विशेष अधिवेशन मुंबईत पार पडले. त्यानंतर काल रविवारी देवेंद्र फडणवीस सरकारचा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये पार पडला. आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या पहिल्याच अधिवेशनात राज्यातील जनतेला सरकारकडून मोठी अपेक्षा आहे.
मात्र, महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उद्या दि. 17 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार असल्याचं सांगितलंय, ज्यांना स्वतः च्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर बोलतांना या पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी 5 जानेवारीपर्यंतचा सरकारला अल्टिमेटम दिला होता. तर सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा ही दिल्या होत्या. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरूवात करावी. समाजाला सांभाळायला शिका. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुम्ही जनतेचं मन जिंकण्याचे काम करा, असा सल्ला त्यांनी महायुतीच्या तीनही नेत्यांना दिला.
आता मात्र जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारने 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाही तर मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणार आहेत. मराठा आणि कुणबी एक आहे हा विषय मार्गी काढायचा. 2004 च्या अध्यादेशात दुरुस्ती करायची, यांसह सात-ते आठ मागण्या आम्ही याआधीच सरकारकडे केलेल्या आहेत. त्यांनी त्या पूर्ण मार्गी काढाव्यात. नाहीतर सरकारला पुन्हा एकदा मराठ्यांना सामोरे जावे लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.





