Manoj Jarange : “दगाफटका झाला तर रस्त्यावर उतरणार”; मनोज जरांगेंची बीड प्रकरणावर प्रतिक्रीया

जालना – मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे वाल्मीक कराडवर मोक्का लागला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर संतोष देशमुख यांचे कुटुंब जीवंत आहे. तुम्ही जर दगाफटका केला, तर मराठे राज्यभर रस्त्यावर दिसतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोपी असून त्याला पाठबळ देणाराही मुख्य आरोपी असल्याचा दावा जरांगेंनी केला आहे. वाल्मीक कराडला इतके दिवस बाहेर ठेवला, तो षडयंत्र करण्यासाठी ठेवला होता का? असा सवालही जरांगे यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांचे लेकरे उन्हात टाकून हा खून पचवायचा म्हणून वाल्मीक कराडला इतके दिवस बाहेर ठेवले होते का? वाल्मीक कराड स्वत: सरेंडर होत असल्याची प्रतिक्रिया देऊच कसा शकतो? असे अनेक प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केले. एक लेकरू मारून टाकले आणि माझा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया तो देऊच कसा शकतो?
या प्रकरणात मंत्री, आमदार असे कोणीही आरोपी असो वाचणार नाही. ते सर्व एकमेकांशी बोललेले आहेत, त्यांची कॉल डिटेल असणार, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. एवढी मोठी घटना झाल्यावर आरोपींनी त्यांच्या नेत्याचा आधार घेतलेलाच आहे. या हत्या प्रकरणात सर्वांनी एकमेकांचा आधार घेतलेला आहे, असा आरोपही त्यांनी केला.





