Manoj Jarange: २९ ऑगस्टला महाआंदोलन! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, ‘हा’ मोठा निर्णय घेणार?
Manoj Jarange: इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या; सातारा दौऱ्यात मनोज जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका.

Manoj Jarange – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने आता वेळकाढूपणा न करता ठोस निर्णय घ्यावा. राज्यात सापडलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठा बांधवांना तातडीने कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील गॅझेटची अंमलबजावणी करावी, तसेच रद्द करण्यात आलेली प्रमाणपत्रे व दाखले नियमानुसार दुरुस्त करावेत अन्यथा दि. २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे अंतिम आणि निर्णायक बेमुदत उपोषण सुरु करु,
असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात रात्री उशिरा पत्रकार परिषदेत दिला. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी टाळाटाळ केली जाते, असा आरोप जरांगे- पाटील यांनी केला. मराठा समाजाला आता केवळ आश्वासनांची गरज नसून शासन निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी आहे. ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्याचा लाभ मराठा समाजाला का मिळत नाही,
असा प्रश्न त्यांनी सरकारला केला. सातारा गॅझेटची अंमलबजावणी हा मराठा समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. शासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. कुणबी नोंदी कमी करण्याचा, त्यावरुन प्रमाणपत्रे देण्यास अडथळे निर्माण करण्याचा किंवा यापूर्वी दिलेली प्रमाणपत्रे रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
‘आता आश्वासन नाही, निर्णय हवा’
मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून आंदोलन चिघळवण्याची वेळ सरकारने आणू नये. दि. २९ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र असेल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात झालेली अंमलबजावणी याचा हिशेब मराठा समाजासमोर मांडावा. अन्यथा आगामी आंदोलनाला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा देत जरांगे -पाटील यांनी सातारा दौऱ्यातून सरकारला निर्णायक लढ्याचे संकेत दिले.
शिदोरी खुली करण्याचे राजेंना आवाहन
साताऱ्यातील दौऱ्यात जरांगे- पाटील यांनी सातारा आणि औंध गॅझेटचा मुद्दा ठामपणे पुढे आणत कोल्हापूर व सातारा येथील राजांना मराठा समाजाच्या मुलाबाळांसाठी जुन्या कुणबी नोंदी आणि गॅझेटची ‘शिदोरी’ खुली करण्याचे आवाहन केले. हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि औंध गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
जरांगे- पाटील यांची भूमिका आता ‘मागे हटायचे नाही’ या भूमिकेवर येऊन ठेपली आहे. विशेष मागास प्रवर्गाच्या प्रमाणपत्रांबाबत झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात, जुन्या नोंदींच्या आधारे पात्र मराठ्यांना प्रमाणपत्रे मिळावीत आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.






