Manoj Jarange । toll waiver । राज्यात आता विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. मनोज जरांगे म्हणाले की, “आज झालेल्या शिंदे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोलनाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात आली आहे. त्यांना काय मुंबईतील लोक मतदान करतात का? महाराष्ट्रामधील लोक त्यांना मतदान करत नाहीत का? सर्वच टोलनाके सर्वच फ्री करून, गोरगरिबांचे कल्याण होऊ द्या’, असं मनोज जरांगे म्हणालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले? पाहा… मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.