Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी पहिल्यांदाच साकारणार महात्मा गांधीजींची भूमिका
Manoj Bajpayee : २१ दिवसांचा महत्त्वपूर्ण अध्याय पडद्यावर उलगडणार

Manoj Bajpayee : राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज वाजपेयी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आयकॉनिक भूमिका साकारणार आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज वाजपेयींसाठी ही भूमिका अत्यंत खास मानली जात आहे. त्यांच्यासोबत दिग्गज अभिनेते सौरभ शुक्लासुद्धा एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दिग्दर्शक सुधीर मिश्रा आणि निर्माते अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील फारसा चर्चेत नसलेला २१ दिवसांचा महत्त्वपूर्ण अध्याय पडद्यावर उलगडणार आहे.
गांधीजींच्या आयुष्यातील या महत्त्वपूर्ण काळातील त्यांचा संघर्ष, विचार आणि निर्णय मनोज बाजपेयी आपल्या खास अभिनयशैलीतून साकारताना दिसतील. या ऐतिहासिक कथेत अभिनेता सौरभ शुक्ला यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांची फळी आणखी दमदार झाली आहे.
चित्रपटाच्या कथेवर भाष्य करताना सुधीर मिश्रा यांनी सांगितले की, ही कथा स्वातंत्र्याच्या काळातील गांधीजींच्या आयुष्यातील २१ दिवसांवर आधारित आहे. देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करत असताना दिल्ली सत्तेचे केंद्र बनत होती. मात्र, त्याच काळात गांधीजींनी दिल्लीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय केवळ माघार नव्हता, तर स्वतःला नव्याने घडवण्याच्या त्यांच्या वैयक्तिक प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्या काळातील केवळ मुख्य घटनांचे वर्णन आहे, परंतु हा प्रकल्प त्या ऐतिहासिक निर्णयामागील कारणे, त्यांचे वैयक्तिक विचार आणि मानसिक मंथन सखोलपणे समोर आणेल.
दिग्गज मेकर्सची जुगलबंदी
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची क्रिएटिव्ह टीम. सामाजिक मुद्द्यांवर ‘मुल्क’ आणि ‘थप्पड’ सारखे चित्रपट बनवणारे अनुभव सिन्हा आपल्या ‘बनारस मीडिया वर्क्स’ या बॅनरखाली याची निर्मिती करत आहेत.
तर ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ आणि ‘धारावी’ सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले सुधीर मिश्रा याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या चित्रपटाची निर्मिती अनुभव सिन्हा यांच्यासोबत नरेंद्र हिरावत करत असून, हा चित्रपट एनएच स्टुडिओजद्वारे सादर केला जाणार आहे. Manoj Bajpayee
हेही वाचा:






