Top 10 News : आता लाडक्या मुलींना 2 हजार मिळणार, शिक्षकांना ई-केवायसी बंधनकारक आणि ‘अफरातफरी’ची पहिली झलक चर्चेत, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : लाडकी बहीण योजनेनंतर आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सरकार नवा उपक्रम राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

आता लाडक्या मुलींना 2 हजार मिळणार,
GEN Z तरुणींना आता पॉकेट मनी
Top 10 News : लाडकी बहीण योजनेनंतर आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सरकार नवा उपक्रम राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मुलींसाठी ‘कमवा आणि शिका’ योजनेचा विचार सुरू असून, विद्यार्थिनींना दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी मिळण्याची शक्यता आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये CSRच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेचा सुमारे १२ लाख विद्यार्थिनींना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रस्तावावर विरोधकांनी टीका केली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना पैसे वाटण्यापेक्षा महाविद्यालयांमधील मूलभूत सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची मागणी केली आहे.
५ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण कायम
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला आहे. मात्र, मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या पाच जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येऊ शकतात. राज्यातील इतर भागांत पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ राहण्यासह हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षकांना ई-केवायसी बंधनकारक;
२० सप्टेंबर अंतिम मुदत
महाराष्ट्रातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालार्थ प्रणालीवर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तीन वेळा मुदतवाढ देऊनही हजारो कर्मचाऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण आहे. आता २० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास ऑक्टोबर महिन्याचे, नोव्हेंबरमध्ये मिळणारे वेतन रोखले जाणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे पगारबिलही अपलोड केले जाणार नाही. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शालार्थ प्रणालीतील गैरप्रकार आणि त्रुटींच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.
मुंबईत भीषण दुर्घटना
कुर्ल्यात क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी
मुंबईतील कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरात शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. जेसीबी मशीन क्रेनच्या सहाय्याने उचलत असताना अचानक क्रेन आणि जेसीबी खाली कोसळले. या दुर्घटनेत ८ ते १० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. क्रेनचा काही भाग दोन घरांवर तसेच रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळला. त्यामुळे एक कार आणि ऑटो-रिक्षाचे नुकसान झाले. घटनास्थळी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून क्रेन हटवण्याचे काम सुरू आहे. मालगाड्यांच्या मार्गावर परिणाम झाला असला तरी लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ,
ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ Top 10 News :
राज्यात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, घाऊक बाजारात साखरेचा दर ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. हिंगोलीत किरकोळ दर ७५ रुपये, तर वाशिममध्ये ८० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. पुण्यात साखर ७२ रुपये किलो, तर मुंबईत ६० ते ६५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. वाढत्या दराचा थेट परिणाम मिठाई व्यवसायावर होऊ लागला आहे. पेढे, बर्फी, गुलाबजामुन, जिलेबी आणि लाडू तयार करण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात मिठाईच्या किमती वाढण्याची शक्यता असून, साखरेच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटलाही बसणार आहे.
जगातील सर्वात हलके ट्रिपल सर्टिफाईड हेल्मेट;
बेळगावच्या वेगा ऑटोची निर्मिती
बेळगावच्या वेगा ऑटोने १,०५० ग्रॅम वजनाचे एक्सर एक्स कार्बन हेल्मेट बाजारात आणले आहे. या हेल्मेटला ECE 22.06, DOT आणि ISI अशी तीन प्रमुख सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाली आहेत. कार्बन फायबरपासून तयार करण्यात आलेले हे ऑफ-रोड हेल्मेट बेळगावमध्येच डिझाइन आणि निर्मित करण्यात आले आहे. वजन कमी असल्यामुळे दीर्घकाळ रायडिंग करताना मान आणि डोक्यावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. हेल्मेटच्या अनावरणावेळी वेगा ऑटोचे अध्यक्ष दिलीप चांडक आणि व्यवस्थापकीय संचालक गिरधारी चांडक यांनी उत्पादनामागील तंत्रज्ञान आणि सुरक्षेला दिलेले महत्त्व स्पष्ट केले.
सोनं ३ लाख, तर चांदी ६ लाखांवर जाणार?
रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं आणि चांदीच्या दराबाबत गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारा दावा समोर आला आहे. ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १० हजार डॉलर आणि चांदीचा भाव २०० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. भारतीय रुपयात याचा अर्थ सोनं प्रति १० ग्रॅम सुमारे ३.०६ लाख आणि चांदी प्रति किलो सुमारे ६.१३ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. अमेरिकेच्या वाढत्या राष्ट्रीय कर्जामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे. दरम्यान, स्थानिक बाजारात सोनं १.५६ लाख, तर चांदी २.४१ लाख रुपये किलोवर पोहोचली आहे.
बांगलादेशमध्ये तब्बल ३५ वर्षांनी निवडणूक;
मिर्जा फखरूल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती
बांगलादेशमध्ये १९९१ नंतर तब्बल ३५ वर्षांनी राष्ट्रपतिपदासाठी थेट निवडणूक झाली. सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) उमेदवार मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी २५५ मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार कर्नल (निवृत्त) ओली अहमद यांना ८८ मते मिळाली. एकूण ३४९ नोंदणीकृत मतदारांपैकी ३४३ जणांनी मतदान केले. मिर्जा फखरुल हे शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी बंगभवनच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. माजी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली.
जो रूटचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड!
कर्णधार म्हणून ३ हजार धावा करणारा पहिला खेळाडू
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने पाकिस्तानविरुद्धच्या लीड्स कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दुसऱ्या दिवशी ६६ धावांची खेळी करत रूटने WTCमध्ये कर्णधार म्हणून ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. याशिवाय रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमात सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले. दरम्यान, मायदेशातील कसोटीत सर्वाधिक धावांचा रिकी पाँटिंगचा विक्रम मोडण्यापासून रूट अवघ्या ३७ धावा दूर आहे. पाँटिंगच्या ७,५७८ धावांच्या तुलनेत रूटच्या नावावर ७,५४२ धावा आहेत.
नोटांचा पाऊस, धावपळ अन् गोंधळ;
‘अफरातफरी’ची पहिली झलक चर्चेत Top 10 News :
संजय नार्वेकर यांच्या ‘अफरातफरी’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं, पोलिसांची धावपळ आणि बंदुकीमुळे निर्माण झालेला गोंधळ या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळतो. मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित हा चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. पैशांभोवती फिरणाऱ्या या कथेत नेमका कोणता गोंधळ होतो, याची उत्सुकता मोशन पोस्टरने वाढवली आहे.





