Manjusha Nagpure : महापौर मंजूषा नागपुरे यांचा शिरूरमध्ये जंगी सत्कार; संघर्षातून यशाचं शिखर कसं गाठलं? पाहा
Manjusha Nagpure : पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांचा शिरूर येथे नागरी सत्कार; अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या यशाचा ग्रामस्थांना सार्थ अभिमान.

Manjusha Nagpure – जिद्द, कष्ट आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर प्रतिकूल परिस्थितीतूनही यशाचे शिखर गाठता येते, हे शिरूरची कन्या मंजूषा नागपुरे यांनी सिद्ध केले आहे. डंबेनाल्यातील एका सामान्य घरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता पुणे शहराच्या महापौरपदापर्यंत पोहोचला असून, यामुळे शिरूर तालुक्याचे नाव अभिमानाने उजळले आहे.
या यशानिमित्त शनिवारी (दि. १४) शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात त्यांच्या विशेष नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.मंजूषा नागपुरे यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत आईने शिवणकाम करून कुटुंबाला सावरले, तर मंजूषाताईंनी शिक्षणासाठी शिकवण्या घेतल्या आणि बँकेत नोकरी करून घराला हातभार लावला.
लग्नानंतर पती दीपक नागपुरे यांच्या साथीने त्यांनी समाजकारणात प्रवेश केला. पुणेकरांनी त्यांना सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले आणि त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी सोपवली आहे.
सत्कार सोहळ्याप्रसंगी उद्योगपती प्रकाश धारिवाल, नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे, नाथाभाऊ शेवाळे, राजेंद्र कोरेकर, माजी आमदार पोपटराव गावडे, ॲड. धर्मेंद्र खांडरे आणि सुनील बाफणा यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आपल्या लाडक्या लेकीचा गौरव होताना परिसरातील नागरिकांनी भावूक होत अभिमान व्यक्त केला.
संकटांनी घडवलेले व्यक्तिमत्त्व
मंजूषा नागपुरे यांचे वडील रतनसिंह परदेशी कुवेतमध्ये प्रकल्प प्रमुख असताना युद्धकाळात तब्बल ११ वर्षे अटकेत होते. त्या कठीण काळात त्यांची आई बेबी परदेशी यांनी खंबीरपणे मुलांचे संगोपन केले. आईच्या निधनानंतर अधिक खंबीर बनत मंजूषा यांनी आज हे मानाचे पद प्राप्त केले आहे.
“एका सामान्य कुटुंबातील महिलेला केवळ निष्ठेच्या बळावर ही संधी मिळाली आहे. जीवनातील दुःखे कवटाळून न बसता सामाजिक घटक म्हणून मी भविष्याचा वेध घेत समाजासाठी काम करणार आहे. पतीची साथ आणि आई-वडिलांच्या पुण्याईमुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाली.”
– मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे





