Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा ‘तो’ व्हिडीओ कुणी काढला? मोठी माहिती समोर? तपासाला वेग

मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमुळे कोकाटेंवर टीकेची झोड उठली असून, विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
आता हा व्हिडीओ नेमका कुणी काढला, याचा शोध घेण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाने चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडीओ प्रेक्षक गॅलरीतून काढला गेल्याची शक्यता आहे. लवकरच या प्रकरणाचा अहवाल सभापतींना सादर केला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हायरल व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत कोकाटे विधानपरिषदेच्या सत्रादरम्यान मोबाइलवर ‘जंगली रमी’ हा गेम खेळताना दिसत होते.
या घटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत मंत्र्यांचे बेजबाबदार वर्तन दिसत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले की, सभागृहात कुणीही चित्रीकरण केल्याचे आढळले नाही. त्यामुळे प्रेक्षक गॅलरीतून हा व्हिडीओ काढला गेला असावा, याची तपासणी सुरू आहे.
माणिकराव कोकाटे यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. त्यांनी दावा केला की, “मी रमी खेळत नव्हतो. विधानपरिषदेचे सत्र स्थगित झाल्यावर मी यूट्यूबवर विधानसभेचे कामकाज पाहण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा अचानक जंगली रमीचा पॉपअप आला, जो मी 10-15 सेकंदात स्कीप केला.” त्यांनी हा व्हिडीओ एडिट केल्याचा आरोप करत विरोधकांवर बदनामीचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.
याशिवाय, त्यांनी शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना म्हटले, “मी शेतकऱ्यांना भिकारी म्हटले नाही, तर सरकार भिकारी आहे, कारण ते शेतकऱ्यांकडून एक रुपया पीक विम्यासाठी घेते.” या विधानानेही नव्या वादाला तोंड फोडले.





