परभणी – मोबाईलवरील ऑनलाइन गेमच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाच्या आत्महत्येने रायपूर गावात शोककळा पसरली आहे. ऑनलाइन रमी खेळण्याच्या नशेमुळे २२ वर्षीय राम मुंजाजी चव्हाण याने कुटुंबासाठी जमवलेले लाखो रुपये गमावले. या आर्थिक नुकसानीची भीती आणि अपराधगंड मनात बाळगून त्याने उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. मुंजाजी आणि मंदा चव्हाण हे दोघंही मोलमजुरी करून आपल्या दोन मुलांना शिक्षण देत होते. राम बीकॉम तृतीय वर्षात, तर बहिण राधिका द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. कुटुंबाने राधिकाच्या लग्नासाठी बँकेत पैसे साठवले होते. मात्र रामला ऑनलाईन रमीचे व्यसन लागले आणि त्याने त्या खात्यातील ३ ते ४ लाख रुपये गमावले. पैसे गमावल्याची अपराधी भावना आणि कुटुंबाला कसे सांगावे, या तणावातून रामने आत्महत्येचा निर्णय घेतला. पालकांनी परभणीपासून संभाजीनगरपर्यंत उपचारांसाठी धावपळ केली; परंतु त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. या घटनेमुळे शोकाकुल कुटुंबीयांनी सरकारकडे ऑनलाईन रमी व तत्सम गेम्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढी या गेम्समुळे आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडत असल्याने सरकारने त्वरित कठोर पावले उचलावीत, अशी गावकऱ्यांचीही मागणी आहे.