माणिक साहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री; भाजपच्या बैठकीत निर्णय

आगरतळा – त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपने माणिक साहा यांना नवे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहाच्या नावासह अनेक नावांची चर्चा होती. अखेर सर्व नेत्यांनी साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर आता ते लवकरच शपथ घेऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारू शकतात.
माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष आहेत आणि ते राज्यसभेचे खासदार देखील आहेत. निवडणुकीच्या अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत पक्षाने त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरातील भाजप नेते पक्ष सोडत होते. पक्ष सोडण्याचे कारण बिप्लब देब असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे भाजप उच्चपदस्थांनी निर्णय घेऊन देब यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार देब यांनी राजीनामा दिला आहे.
हायकमांडची भेट घेतल्यानंतर बिप्लब देब यांचा राजीनामा-
शुक्रवारी 13 मे रोजी बिप्लब देब यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीच्या अवघ्या 24 तासांनंतर 14 मे रोजी त्यांनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा सादर केला. राजीनामा दिल्यानंतर बिप्लब देब यांनी हायकमांडच्या सांगण्यावरूनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर पक्ष आपल्यासाठी सर्वांत वरचढ असून पक्षाकडून जी काही जबाबदारी येईल, ती आपण पार पाडू, असेही ते म्हणाले.





