गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचे ‘या’ कारणामुळे केले ‘एमरजन्सी लँडिंग’

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचे गुवाहाटीमध्ये गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अमित शाह आगरतळाला पोहोचणार होते, पण खराब हवामानामुळे त्यांच्या विमानाची सकाळी 10.45 च्या सुमारास गुवाहाटी येथे एमरजन्सी लँडिंग करावे लागले.
अमित शाह बुधवारी ईशान्येकडील राज्यांकडे रवाना झाले होते. त्रिपुरामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा हा दौरा नियोजित करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आज ईशान्येकडील राज्यात दोन रथयात्रा निघणार होत्या. त्रिपुरामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.
अमित शाहांच्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधीक्षक (एसपी) शंकर देबनाथ यांनी माहिती दिली. याविषयी बोलताना, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी रात्री 10 वाजता एमबीबी विमानतळावर उतरणार होते. परंतु दाट धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानाचं लॅंडिंग करणं शक्य झालं नाही.”असे देबनाथ यांनी म्हटले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांनी, उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर आणि दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सबरूम उपविभागातून रथयात्रेला झेंडा दाखवण्यासाठी शाह बुधवारी आगरतळा येथे पोहोचणार होते. परंतु, इमर्जन्सी लॅंडिंगमुळे अमित शाहांना आपला मुक्काम गुवाहाटीतच करावा लागला.





