“अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी कार्यरत” ‘जाणून घ्या’ नेमकं काय म्हणाले त्रिपुराचे मुख्यमंत्री

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे ‘अखंड भारताचे स्वप्न” पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत असे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी म्हटले आहे. मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करताना साहा यांनी दावा केला की सध्या पश्चिम बंगालचे ‘मिनी पाकिस्तान’ मध्ये, रूपांतर होत आहे.
कलम 370 रद्द केल्यास जम्मू-काश्मीरमध्ये अनेकांना रक्तपात होण्याची भीती होती, परंतु हा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर तेथे रक्त सांडले नाही. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी मशाल वाहक म्हणून काम करत आहेत,असे ते म्हणाले.
जिथे श्यामा प्रसाद मुखर्जी या महान नेत्याचा जन्म झाला ती पश्चिम बंगालची माती सध्या मिनी पाकिस्तानमध्ये परावर्तीत होत आहे. मुखर्जी यांनीच पश्चिम बंगाल आणि आसामचा भाग पूर्व पाकिस्तानात समाविष्ट होणार नाही याची काळजी घेतली होती असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, 2018 मध्ये, सीपीआय(एम) आणि कॉंग्रेसमधील अनेक लोक भाजपमध्ये सामील झाले, त्यांनी त्रिपुरामध्ये सरकार स्थापन करण्यास मदत केली. त्यामुळे पक्ष दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी झाला आहे, परंतु जर आपण जनतेशी संबंध टिकवून ठेवू शकलो नाही तर ते आत्मघातकी ठरेल.लोक जागरूक आहेत आणि त्यांच्या नेत्यांच्या कार्याचा मागोवा ठेवतात. आपण संयम बाळगला पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि शक्य तितक्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे साहा यांनी यावेळी नमूद केले.





