त्रिपुरात माणिक साहा यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ; पंतप्रधानांच्या उपस्थिती पार पडला सोहळा

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजप-आयपीएफटी आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर माणिक साहा यांनी आज आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर सलग दुसऱ्यांदा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, त्रिपुरामधील भाजपच्या मोठ्या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
काँग्रेस आणि माकपच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी, ते भाजप सरकारच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालणार आहेत, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे त्रिपुरात पुन्हा एकदा सत्ता आल्यानंतर त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, यासंदर्भात चर्चा सुरू होत्या. पण सर्व चर्चांना पूर्णविराम देत भाजप पक्षश्रेष्ठींनी माणिक साहाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, अशी घोषणा केली.
Manik Saha takes oath as Tripura CM for second consecutive time
Read @ANI Story | https://t.co/1qAofv8a5L
#ManikSaha #TripuraCM pic.twitter.com/kwdtQCUHRB— ANI Digital (@ani_digital) March 8, 2023
माणिक साहा यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्रीही आज त्यांच्यासोबत पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री शाह आणि भाजपचे प्रमुख नड्डा आधीच त्रिपुरात पोहोचले होते. दरम्यान, आज सकाळीच पंतप्रधान त्रिपुरामध्ये दाखल झाले होते. त्रिपुरा भाजप युनिटचे मुख्य प्रवक्ते सुब्रत चक्रवर्ती यांनी यावेळी, “आम्हाला आशा आहे की भाजप 2.0 सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल.” असे म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेस-TUJS ने 1988 मध्ये सीमावर्ती राज्यात डाव्यांचा पराभव केला आणि सरकार स्थापन केले होते. परंतु 1993 मध्ये कम्युनिस्टांकडून पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून 2018 पर्यंत त्रिपुरामध्ये डाव्यांचे सरकार होते. त्रिपुरामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 60 सदस्यांच्या सभागृहात 32 जागा जिंकल्या आहेत. तर त्यांचा मित्रपक्ष आयपीएफटीला एक जागा मिळाली आहे.





