मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक; घरात कोट्यावधींचे सापडले घबाड

Mangaldas Bandal पुणे जिल्हा परिषेदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे मंगलदास बांदल यांच्या घरांवर मंगळवारी अचानक सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकत कारवाई केली होती. अखेर रात्री उशिरा ईडीने मंगलदास बांदल यांना अटक करत मुंबई येथे नेले असल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
त्यावेळी त्यांच्या घरात काही महत्त्वाचे कागदपत्रांसह ५ कोटी ६० लाखांची रोकड तसेच १ कोटींची ४ घड्याळे आढळून आले. जवळपास १६ तासांच्या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना ताब्यात घेतले.
मंगलदास बांदल यांच्यावर पूर्वी आयकर विभागाचा छापा पडला होता, त्यांनतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणात बांदल काही दिवस कारागृहात होते, त्यांनतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. मात्र मंगळवारी सकाळी अचानकपणे मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर व पुणे येथील बंगल्यांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
यावेळी शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. तर, महंमदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बांदल यांची देखील ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली.
कोण आहेत मंगलदास बांदल?
मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती होते. अनेकदा ते वादात सापडले आहेत. फसवणूक, खंडणीसह विविध प्रकरणात त्यांच्या नावावर गुन्हे आहेत. पुणे जिल्हा बँकेच्या कथित फसवणूक प्रकरणात बांदल जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते. त्यानंतर वंचितने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना शिरूरची उमेदवारी दिली होती.
परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या इंदापूर येथील भाजपच्या मेळाव्याला ते हजर राहिले.
त्यामुळे वंचितने त्यांची उमेदवारी रद्द केली होती. दरम्यान त्यांनी अजित पवार यांना साथ दिली असल्याने ते महायुतीमध्ये असल्याचे मानले जात असताना मंगलदास बांदल हे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जाऊ लागले होते. मात्र अचानकपणे घडलेल्या या घडामोडीमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:
विधानसभापूर्वी ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी? हसन मुश्रीफांना आव्हान देण्याची शक्यता





