Manchar News: महाळुंगे पडवळमध्ये कुस्त्यांचा थरार! ३५० पहिलवानांची कुस्ती अन् २ लाखांची बक्षीसं
Manchar News: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती; ५० लाख रुपयांच्या निधीतून सुसज्ज आखाडा उभारण्याचे आश्वासन.

Manchar News – श्रावणी बैलपोळ्यानिमित्त महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी सायंकाळी रंगलेल्या कुस्तीच्या आखाड्यात 350 हून अधिक पहिलवानांनी सहभाग घेतला. ‘जोड येऊ द्या, जोड’च्या पहाडी आवाजाने परिसर दुमदुमून गेला. विविध गटांतील चित्तथरारक कुस्त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कुस्ती आखाड्यात दोन लाखांहून अधिक रुपयांची बक्षिसांची रक्कम वितरित करण्यात आली.
देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद आणि माजी आमदार (कै.) अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कुस्ती आखाड्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी सभापती देवदत्त निकम, उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषद सदस्य विष्णु हिंगे, जिल्हा परिषद सदस्या प्रीती थोरात,
उषाताई कानडे, अजय आवटे यांच्यासह ग्रामपंचायत व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रेवन मिसाळ, दादु शिर्के, श्रुतिका मुजूमले, तन्वी रोकडे, राजवर्धन कातोरे, प्रतिक गवारी, विशाल तन्वीर, संदिप म्हस्के, राजु शेख आणि ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या कुस्त्या लक्षवेधक ठरल्या. विजय पवार (श्रीगोंदा) आणि अंकित धुळकंड (पारनेर) यांच्यात झालेली 15 हजार रुपयांची कुस्ती विशेष चर्चेची ठरली.
आखाड्यात 100 रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. विजयी पहिलवानाची आखाड्यातून मिरवणूक काढण्यात आली. विविध भागांतून आलेले अनेक पहिलवान मुक्कामी थांबले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून डॉ. विठ्ठल चासकर, मानिक सैद, रमेश पडवळ, नामदेव पडवळ आणि नाना डोके यांनी काम पाहिले.
“ग्रामस्थांनी कुस्ती आखाड्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. 50 लाख रुपयांच्या निधीतून सुसज्ज कुस्ती आखाडा उभारण्यासाठी सहकार्य करू.”
– दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री




