Manchar News: एक-दोन नव्हे तर तब्बल २५ वर्ष! जारकरवाडीतील ‘कापडदरा’ रस्त्याचा वाद अखेर मिटला

प्रभात वृत्तसेवा
मंचर – जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील कापडदरा येथे बांधावरून असलेल्या वादातून गेली २५ वर्ष बंद असलेला रस्ता गुरुवार, दि. ८ रोजी तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांनी दिलेल्या आदेशानुसार वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रस्ता खुला झाल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
जारकरवाडी येथील कापडदरा येथे दोनशे ते अडीचशे लोकवस्ती असून त्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी व वाहतुकीसाठी असलेला रस्ता गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून वादामुळे बंद होता. याबाबत नागरिकांनी मागील वर्षी तहसीलदार यांच्याकडे हा रस्ता खुला होणेबाबत तक्रारी अर्ज केला होता. याबाबत वारंवार सुनावणी घेऊन वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून शासनाच्या नियमानुसार तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांनी हा रस्ता खुले करण्याबाबत आदेश देवून नागरिकांमध्ये मत परिवर्तन केले.
त्यानंतर मंडळ अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, महसूल अधिकारी, पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा रस्ता सामंजस्याने खुला करण्यात आला. हा रस्ता खुला झाल्यामुळे दोनशे ते अडीचशे लोकवस्ती असलेल्या नागरिकांना रस्त्याने ये-जा करता येणार असून हा रस्ता वापरण्यासाठी खुला झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“जारकरवाडी-कापडदरा येथील रस्त्याचा वाद मिटवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महत्त्वाचे सहकार्य केले. ज्यांच्या बाबत तक्रारी होत्या. त्या व्यक्तींमध्ये मतपरिवर्तन करून मार्ग काढण्यात प्रशासनाला यश आले.”
– डॉ.सचिन वाघ,तहसीलदार, घोडेगाव (आंबेगाव तालुका).





