Pune District : डिंभे धरणातील जलसाठा तळाला: पाणी नियोजनाचे आव्हान
Pune District : मागील वर्षी मे आणि जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती.

मंचर : आंबेगाव तालुका आणि परिसरातील पिण्याच्या पाणीपुरवठ्यासह सिंचनासाठी महत्त्वाचे मानले जाणारे हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरण सध्या अत्यल्प जलसाठ्यामुळे चर्चेत आले आहे. ३.३८ टक्क्यांवर पाणी साठा स्थिर झाला आहे. पाऊसाला सुरुवात होऊनही पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणातील पाण्याची पातळी चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, गतवर्षी ३० जून रोजी धरणात ३६.७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा त्याच दिवशी हा साठा केवळ ३.३८ टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागासह शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी मे आणि जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती.
यंदा मात्र, पावसाने दडी मारल्याने नवीन पाणी धरणात दाखल होत नसून उपलब्ध साठ्यावरच सर्व व्यवस्था सुरू आहे. परिणामी भविष्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन, शेतीसाठी पाणी उपलब्धता आणि सिंचन व्यवस्थेवर ताण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामान विभागाने आगामी काही दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसावरच भिस्त.
हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणातील जलसाठा मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी आहे.पावसाळा सुरू झाला असला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. धरणातील साठा वाढण्यासाठी पाणलोट क्षेत्रात चांगला आणि सातत्यपूर्ण पाऊस होणे गरजेचे आहे. अशी माहिती कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी सांगितले.





