Manchar News: काठापूर येथे बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
Manchar News: काठापूर बुद्रुक येथील थोरातवस्ती परिसरात धुमाकूळ घालणारी दीड वर्षाची मादी बिबट्या गुरुवारी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद.

Manchar News – काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील थोरातवस्ती परिसरात मागील अनेक दिवसांपासून वावर असलेल्या सुमारे दीड वर्षे वयाच्या मादी बिबट्याला वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवार दि.३ रोजी पहाटे जेरबंद केले.बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.पकडलेल्या मादी बिबट्याला पुढील उपचार व निरीक्षणासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले.
थोरातवस्ती परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.दोन दिवसांपूर्वी संजय किसन वायाळ यांच्या घरासमोर वनविभागाने पिंजरा लावला होता.या पिंजऱ्यात गुरुवारी पहाटे मादी बिबट्या अडकली.बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यासह ताब्यात घेतले.
मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले,वनपाल नीलम चव्हाण, वनरक्षक पूजा कांबळे तसेच कर्मचारी अशोक जाधव, रामदास वळसे पाटील यांनी बिबट्याला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अजून ही परिसरात बिबट्याचा वावर आहे.पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी पोलिस पाटील अमोल करंडे व माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी केली आहे.
“थोरातवस्ती परिसरातील बिबट्याचा वावर लक्षात घेऊन पिंजरा लावण्यात आला होता.पहाटे मादी बिबट्या जेरबंद झाली असून तिला माणिकडोह निवारा केंद्रात सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे.”
– विकास भोसले. वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर.





