Leopard Rescue : पिंपरखेड मध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
बिबटप्रवण क्षेत्र म्हणून अवघ्या महाराष्ट्रात चर्चेला आलेल्या पिंपरखेड (शिरूर) येथे शुक्रवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास एका पाच वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

Leopard Rescue : बिबटप्रवण क्षेत्र म्हणून अवघ्या महाराष्ट्रात चर्चेला आलेल्या पिंपरखेड (शिरूर) येथे शुक्रवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास एका पाच वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
आजपर्यंत सात महिन्यात पिंपरखेड बीटमध्ये जेरबंद करण्यात आलेला हा ५३ वा बिबट्या असल्याने परिसरातून एकीकडे सुटकेचा श्वास सोडला जात असला, तरी बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण असून अलीकडेदेखील बिबट्यांचा वावर दिसून येत आहे.
पिंपरखेड आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण होते. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून वनविभागाने पिंपरखेड येथील शेतकरी कुशाबा चिमाजी बोऱ्हाडे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेली ही पाच वर्षांची मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकली.
बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेरबंद केलेल्या मादी बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी आणि पुढील देखभालीसाठी या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.





