Ambegaon News: प्रशासकीय आदेशाचा कहर! मुलांच्या आहारासाठी आवाज उठवणार्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई
Ambegaon News: सामाजिक कार्यकर्ते सीताराम जोशी आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध; आहाराच्या गुणवत्तेची चौकशी सोडून सेविकेवरच कारवाई केल्याचा आरोप.

Ambegaon News – ठाकरवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नंबरवाडी अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणार्या आहाराच्या गुणवत्तेबाबत आवाज उठविणार्या अंगणवाडी सेविका रेश्मा शिवाजी पारधी यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आहाराचा दर्जा सुधारण्याची मागणी करणार्या सेविकेवर ‘प्रशासकीय आदेशाचा कहर’ करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
रेश्मा पारधी यांनी अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणार्या आहारातील वाटाणे व भरडा व्यवस्थित शिजत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मुलांना दर्जेदार व पौष्टिक आहार मिळावा, या उद्देशाने त्यांनी संबंधित बाब निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. मात्र, ही बाब वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्याऐवजी त्याचे चित्रण करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याने शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.
या प्रकरणी पारधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. आपल्या खुलाशात मुलांना दर्जेदार व पौष्टिक आहार मिळावा, हाच आपला उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचे नमूद करून त्यांच्यावर सेवा समाप्तीची शिफारस करण्यात आली. 17 ऑगस्टपासून सेवा समाप्तीचा निर्णय घेण्यात आल्याने या कारवाईच्या पद्धतीबाबतही ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे रेश्मा पारधी मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांनी जीवन संपविण्याची भाषा केल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. त्यांच्या दोन मुलांच्या भवितव्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची संवेदनशीलतेने दखल घेऊन कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे.
“मुलांच्या आरोग्यासाठी आहाराचा दर्जा सुधारण्याची मागणी करणार्या सेविकेवर कारवाई करणे संतापजनक आहे. शासनाने आदेशाचा पुनर्विचार करून सेवा समाप्ती थांबवावी आणि आहाराच्या गुणवत्तेची चौकशी करावी.”
– सीताराम जोशी, सामाजिक कार्यकर्ते
“आहाराबाबत सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन रेश्मा पारधी यांनी शासनाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी त्यांच्यावर सेवेतून कमी करण्याची कारवाई केली आहे. हा विषय पुणे जिल्हा परिषदेशी निगडित असल्याने त्यांनी आपली बाजू तेथे मांडावी.”
– कुलदीप जाधव, बालविकास अधिकारी, मंचर-घोडेगाव






