प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस –भाजप विरुद्ध शिवसेना, अशी लढत रंगण्याचे संकेत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांनी एकत्र येत आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस आय पक्षाने स्वतंत्र भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणे अधिकच जटील झाली आहेत.त्यामुळे मतदार कोणावर विश्वास दाखवणार याची उत्सुकता वाढली आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, १७ प्रभागांमध्ये नगरसेवक पदांसाठी तब्बल १२३ अर्ज दाखल झाले आहेत.हीच निवडणूक नगरपंचायत स्थापन झाल्यानंतरची पहिली असल्याने तालुक्याचे संपूर्ण लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.अनेक इच्छुकांना त्यांच्या-त्यांच्या पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी वाढली आहे. काहींनी थेट पक्षांत बदल केला तर अनेकांनी अपक्ष उमेदवारीचा मार्ग स्वीकारला आहे. भाजपने सुरुवातीला मंचरमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला होता; मात्र वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. यानंतरही असंतोष पूर्णपणे शांत झाला नाही. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांच्या स्नूषा प्राची आकाश थोरात यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केलेल्या जागृती महाजन यांनाही अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनीही अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उडी घेतली आहे. भाजप मंचर मंडलाध्यक्ष स्नेहल चासकर यांनीही अपक्ष म्हणून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत पक्षातील नाराजी अधोरेखित केली आहे.नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोनिका सुनील बाणखेले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी सुनील बाणखेले हे एक असून, त्यांच्या आग्रहामुळे ही उमेदवारी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.शिवसेना या निवडणुकीत विशेष दखल घेण्यासारखी तयारी करत आहे. बंड थोपवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आवश्यक तीनही पक्षांनी नगरसेवक पदांसाठी देखील स्वतंत्र उमेदवारी दाखल करून आगामी लढतीची रंगत वाढवली आहे.दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने असंतोष असलेल्या अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यामुळे विविध प्रभागांत बंडखोरीची ठिणगी पेटली आहे. हे बंड स्थिरावण्यासाठी पक्षनेत्यांना पुढील काही दिवसात मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा या बंडखोरांचे अस्तित्व पक्षांच्या गणितावर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.