प्रभात वृत्तसेवा मंचर – अष्टविनायक रस्त्यावर पोंदेवाडी फाटा (ता.आंबेगाव) येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सविंदणे (ता.आंबेगाव) येथील दत्तात्रय ज्ञानेश्वर गावडे (वय ३२) या युवकाचा मृत्यू झाला.हा अपघात शुक्रवार, दि.२६ रोजी सकाळी आठ वाजता घडला. अपघात झाल्यावर अज्ञात वाहन पसार झाले. पारगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, सविंदणे येथून मोटरसायकल क्रमांक एम एच १४ सी एन ९८३० याद्वारे पारगावकडे दत्तात्रय ज्ञानेश्वर गावडे हे आपली दुचाकी घेऊन जात असताना पोंदेवाडी फाटा येथे समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी दुचाकीस्वार दत्तात्रय गावडे यांना पारगाव येथील रुग्णवाहिका चालक संदीप घुले यांनी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु पुढील उपचारासाठी मंचर येथे आणत असताना पिंपळगाव येथे वाटेतच त्यांचे निधन झाले. अपघात करून अज्ञात वाहन चालक पळून गेला आहे. अपघाताची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांना मिळताच त्यांनी पारगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तातडीने पंचनामा करण्याची सूचना केली. तसेच मंचर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने शवविछेदन करण्यासाठी समक्ष भेट देवून सूचना केली. मंचर उपजिल्हा रुग्णालयात पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.अपघाताची फिर्याद रतन दत्तात्रय पडवळ रा. सविंदणे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात दिली.मयत दत्तात्रय गावडे यांच्यामागे आई-वडील भाऊ असा परिवार आहे.