Sanaswadi Accident : शेगडी विक्रीसाठी आले अन जीवाला मुकले; सणसवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
Sanaswadi Accident : शेगडी विक्रीचा व्यवसाय आटोपून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले, मात्र भरधाव वाहनाच्या धडकेत इंदापूरच्या दोन नातेवाईकांचा जागीच मृत्यू.

Sanaswadi Accident – सणसवाडी (ता. शिरूर) परिसरात कोळशावर चालणाऱ्या शेगड्या विक्रीसाठी आलेल्या दोन नातेवाईकांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राजेंद्र मारुती साळुंखे (वय ४०) आणि सागर विलास जाधव (वय ३२) अशी मृत व्यक्तींची नावे असून, हे दोघेही इंदापूर तालुक्यातील रहिवासी होते. पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथील राजेंद्र साळुंखे आणि सागर जाधव हे आपल्या कुटुंबासह शनिवारी (दि. ११) सणसवाडी भागात शेगडी विक्रीसाठी आले होते. दिवसभर विक्री केल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास हे दोघे पुणे-नगर महामार्गालगत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी परतत असताना पुण्याकडून अहिल्यागरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी रवींद्र दगडू जाधव यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र साळुंखे आणि सागर जाधव यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर या अपघाताचा पुढील तपास करत असून, धडक देऊन फरार झालेल्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.





